(चिपळूण)
तालुक्यातील मुर्तवडे येथील सुतारवाडीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नळपाणी योजनेच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांसह चिपळूण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमा भारती पाटील यांची भेट घेत प्रशासनाला जाब विचारला.
सुतारवाडीमध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत ५१ लाख रुपयांची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. या कामाची जबाबदारी ठेकेदार आशिष वसंत मोहरेकर यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाने झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेअंतर्गत केवळ विहिरीचा खड्डा करण्यात आला असून पाण्याची टाकी अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. तसेच गावात पाईप टाकून ठेवण्यात आले असून काम पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे संपूर्ण योजना अपूर्ण आणि निकृष्ट अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गंभीर बाब म्हणजे काम पूर्ण न होता देखील संबंधित ठेकेदाराने सुमारे ४१ लाख रुपयांचे बिल उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी सुतारवाडीतील नागरिकांना अद्याप नळपाणी योजनेचा लाभ मिळालेला नाही. गावकऱ्यांना नदीतील मळकट व अस्वच्छ पाणी पिण्याची वेळ येत असून त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्या शिवानी संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालय गाठले. यावेळी गटविकास अधिकारी उमा भारती पाटील यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत उद्या प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच सोमवारी जलसिंचन विभागाचे डेप्युटी इंजिनिअर, संबंधित ठेकेदार आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी प्रशासनाला कडक इशारा देत सांगितले की, जलजीवन मिशन ही केंद्र व राज्य शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. मात्र स्थानिक पातळीवरील हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे दोषींवर तात्काळ कारवाई करून योजना तातडीने पूर्ण करावी, अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

