( चिपळूण / वार्ताहर )
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील बहादुरशेख नाका ते हॉटेल अतिथी परिसरापर्यंतच्या बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून, आता अंतिम टप्प्यातील कामांना वेग आला आहे. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलावर डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र उड्डाणपुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे काम अद्याप अपूर्ण असून, ते गणेशोत्सवानंतर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सुमारे १,८४० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलावरील सर्व स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता डांबरीकरणासह रस्त्याच्या पृष्ठभागाची समतलता आणि वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या इतर कामांवर भर देण्यात आला आहे. संपूर्ण उड्डाणपुलाचे डांबरीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होणार असल्याने जोडरस्त्यांचे काम सध्या हाती न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यांचे उर्वरित काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असले तरी त्याचा पूर्ण आणि सुरळीत वापर सुरू करण्यासाठी जोडरस्त्यांचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव काळात चिपळूण शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या दोन्ही सर्व्हिस रोडची प्रत्येकी एक लेन वाढविण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच सर्व्हिस रोडच्या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा केली जात आहे.
चिपळूण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. गणेशोत्सवापूर्वी डांबरीकरणाचे काम पूर्ण करून उपलब्ध मार्गाचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जोडरस्त्यांचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर चिपळूणमधील वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


