(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने उज्जैन येथे महाकालेश्वरच्या चरणी होणारा ऐतिहासिक भस्म लिंगार्चन सोहळा राष्ट्र आणि सकल समाजासाठी महत्त्वाचा आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांनी केले.
सेवामार्गातर्फे ५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या भव्यदिव्य अतिउच्च सेवेच्या पूर्वतयारीसाठी गुरुपुत्र श्री. मोरे यांनी नुकताच उज्जैनचा दौरा केला. तेथे राज्यभरातून आलेल्या जिल्हा व तालुका प्रतिनिधींना त्यांनी संबोधित करून कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित केली. त्यानंतर मध्य प्रदेशातील इंदौर, बुऱ्हाणपूर सेवाकेंद्र आणि जळगावमधील मुक्ताईनगर सेवाकेंद्रात त्यांचे सत्संग मेळावे पार पडले. ठिकठिकाणी मार्गदर्शन करताना श्री. मोरे म्हणाले की, राष्ट्र आणि मानव कल्याणासाठी आपण ही सामूहिक सेवा घेत आहोत. उज्जैन नगरी ही सप्त मोक्षपुरींपैकी एक आहे. हे शक्तिपीठ देखील आहे.काळाचे काळ महाकाळ येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात भक्तांचे कल्याण व रक्षण करतात. शिवाय महाकुंभपर्व म्हणून या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे न भूतो न भविष्यती होणाऱ्या या ऐतिहासिक भस्म लिंगार्चन सोहळ्यात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
५ जानेवारीला भस्म लिंगार्चन सोहळा
उज्जैन येथील बडनगर रोड पंचायती आखाडा श्री निरंजनी या ठिकाणी श्री महाकालाच्या चरणी सामूहिक सेवा रुजू केली जाणार आहे. ५ जानेवारीला सकाळी आठ वाजता भूपाळी आरती त्यानंतर प्रधान संकल्प, सकाळी ८ ते १०:२० या वेळेत ऐतिहासिक भस्म लिंगार्चन सोहळा होईल. सकाळी १०:३० च्या नैवेद्य आरतीनंतर परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांचे प्रासादिक हितगुज व त्यानंतर सेवेकऱ्यांना प्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.
४ जानेवारीला मंगळ पूजन विधी
पत्रिकेत मंगळ दोष असल्यास श्री क्षेत्र उज्जैन येथे मंगळ पूजन विधी करण्याचा उपाय सांगण्यात आला आहे. त्यामुळे भस्म लिंगार्चन सोहळ्यानिमित्ताने ४ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता कार्यक्रमस्थळी मंगळ ग्रह अनुष्ठान पूजन होणार आहे. या विशेष अनुष्ठानचा सेवेकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

