( मुंबई )
राज्यात वाढत्या सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. साप चावल्यानंतर तो विषारी होता की बिनविषारी, हे तात्काळ ओळखण्यासाठी विशेष ‘अँटी स्नेक व्हेनम किट’ विकसित करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील सर्पदंशाच्या वाढत्या घटनांचा मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार श्वेता महाले, अर्जुन खोतकर आणि जयंत पाटील यांनीही सहभाग घेतला.
‘अँटी स्नेक व्हेनम किट’ कसे काम करणार?
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, या विशेष किटच्या मदतीने रुग्णाला चावलेला साप विषारी आहे की बिनविषारी, हे अल्पावधीत समजू शकणार आहे. त्यामुळे सापाची प्रजाती ओळखून डॉक्टरांना अधिक अचूक आणि योग्य उपचार पद्धती (Treatment Protocol) अवलंबता येईल. त्यांनी सांगितले की, अनेक वेळा साप चावल्यानंतर भीतीमुळेच रुग्णाची प्रकृती गंभीर होते. या किटमुळे अनावश्यक भीती कमी होऊन योग्य वेळी उपचार सुरू करता येतील आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.
‘एकाच लसीऐवजी प्रजातीनुसार लस तयार करा’
लक्षवेधी मांडताना आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मुख्यत्वे चार प्रकारचे विषारी साप आढळतात आणि प्रत्येक सापाचे विष वेगळ्या प्रकारचे असते. त्यांच्या मते, सध्या सर्व सर्पदंशासाठी एकाच प्रकारची ‘पॉलिव्हॅलंट’ लस वापरली जाते. मात्र, विविध भागांतील सापांच्या विषामध्ये फरक असल्याने ‘मोनोव्हॅलंट’ म्हणजे विशिष्ट सापाच्या विषासाठी स्वतंत्र लस विकसित करण्याची गरज आहे. यासाठी राज्यात ‘रिजनल व्हेनम बँक’ स्थापन करण्याची तसेच सर्पदंशाला महामारी (Pandemic) घोषित करण्याचा विचार करणार का, असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला.
आमदार श्वेता महाले यांनी ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर सर्पदंशाचे सर्वाधिक बळी ठरत असल्याचे सांगितले. त्यांनी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंशविरोधी लसींचा पुरेसा साठा, आयसीयू सुविधा आणि स्वतंत्र सर्पदंश प्रतिबंधक धोरण तयार करण्याची मागणी केली.
ICMR च्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसींचा साठा उपलब्ध
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ICMR च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्पदंश उपचारासाठी आवश्यक अँटी-स्नेक व्हेनम लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच, प्रत्येक सापाच्या प्रजातीनुसार अधिक प्रभावी लस विकसित करण्यासाठी ICMR संशोधन करत आहे, अशी माहितीही त्यांनी सभागृहात दिली. राज्य सरकारचे हे नवीन ‘अँटी स्नेक व्हेनम किट’ सर्पदंश उपचार अधिक अचूक, जलद आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

