(रत्नागिरी / वार्ताहर)
कुरतडे येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत विविध वजनी गटांत सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले असून, त्यांच्या कामगिरीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या विभागात सोहम खंडेराव पाटील याने ४२ किलो वजनी गटात, तर समर्थ कुदळे याने ४६ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. १६ वर्षांखालील मुलींच्या विभागात अनुराधा गांजवे हिने ४६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
तसेच १७ वर्षांखालील विभागात अथर्व घाडगे याने ५१ किलो वजनी गटात, तर आविष्कार चौगुले याने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. या सर्व विजयी विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशामागे क्रीडा शिक्षक मानसिंग कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल घोरपडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आंबर्डेकर काकी तसेच आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. मांडवकर सर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कुस्ती क्षेत्रात मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेसह पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे.


