(रत्नागिरी / वार्ताहर)
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या विद्यार्थी सचिव (General Secretary – GS) पदासाठी झालेल्या निवडणुकीत साईश कदम यांची विद्यार्थी सचिवपदी निवड झाली.
विद्यार्थी सचिव पदासाठी MBA पार्ट १ मधील साईश कदम आणि MA पार्ट १ मधील अमृत गोरे यांच्यात निवडणूक झाली. या निवडणुकीत साईश कदम यांनी बाजी मारत विद्यार्थी सचिवपद मिळवले.
विद्यार्थी सचिव म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासह त्यांच्या विविध प्रश्नांना आणि अपेक्षांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता साईश कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयीन स्तरावर अभिनंदन करण्यात आले असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्राचार्य मकरंद साखरकर, प्रशासकीय उपप्राचार्य सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच उपप्राचार्य आणि निवडणूक निरीक्षक डॉ. कल्पना आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी डॉ. आनंद आंबेकर यांच्यासह डॉ. अश्विनी देवस्थळी, श्री. अमोल सहस्रबुद्धे आणि श्री. अंकित सुर्वे यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.


