(देवरूख / वार्ताहर)
देवरूख-रत्नागिरी मार्गावर पाटगाव बसथांब्याजवळ आज दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी ( MH08 AA 0404) आणि टेम्पोची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुण आणि तरुणी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटगाव येथील गोपाळवाडीच्या दिशेने जाण्यासाठी एक टेम्पो वळत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक झाली. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने जात होता. त्याचवेळी टेम्पो गोपाळवाडीच्या दिशेने वळत असताना हा अपघात घडला.
धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी तरुण आणि तरुणीला तातडीने उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हे. काँ. सचिन कामेरकर, पो. काँ. सचिन लगारे, महिला पो. हे. काँ. आर्या वेलवणकर आणि महिला पो. काँ. रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करून पंचनामा केला
या अपघातामुळे देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव बसथांब्याजवळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून पंचनामा व पुढील तपासाची कार्यवाही सुरू आहे.


