(संगमेश्वर /प्रतिनिधी)
सह्याद्रीच्या कुशीत दडलेला इतिहास, गड-किल्ल्यांचा वारसा, घनदाट वनराई, धबधबे आणि साहसी पर्यटनाची विपुल क्षमता असलेल्या हेळवाक–धनगरवाडा–रामघळ–वाघणे–भैरवगड–पाथरपुंज–प्रचितगड–कलावंतीणीची विहीर–कंधारडोह या संपूर्ण मार्गाचा केरळच्या धर्तीवर अधिकृत वन ट्रेकिंग सर्किट म्हणून विकास करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय विजया श्रीधर नातू यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी त्यांनी वनमंत्री गणेश नाईक, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई तसेच स्थानिक आमदार सत्यजित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा सुरू केला आहे.
सह्याद्रीतील हा मार्ग केवळ ट्रेकिंगपुरता मर्यादित नसून त्याला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि जैवविविधतेचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे या परिसराचे अनियंत्रित पर्यटन न करता नियोजनबद्ध, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने संवर्धन करत पर्यटनाच्या नकाशावर आणण्याची आवश्यकता डॉ. नातू यांनी अधोरेखित केली आहे. या संपूर्ण मार्गाचे वनविभागामार्फत DGPS, Handheld GPS, Total Station, Drone Survey आणि GIS Mappingच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करावे. त्यानंतर अधिकृत Forest GIS Map तसेच GPX, KML आणि KMZ ट्रॅक तयार करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
ट्रेकिंग मार्गावरील सुरक्षिततेलाही प्राधान्य देत GPS आधारित Emergency Rescue System आणि QR Code प्रणाली उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे वाट चुकलेले पर्यटक, अपघातग्रस्त अथवा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींचे अचूक स्थान शोधून त्यांच्यापर्यंत बचाव पथक पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे. यातील प्रचितगड–कंधारडोह हा परिसर ‘Heritage & Nature Trek Zone’ म्हणून विकसित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. केरळ वनविभागाच्या SFDA/FDA आधारित इको-टुरिझम आणि अधिकृत ट्रेक व्यवस्थापनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही या प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका डॉ. नातू यांनी मांडली आहे. त्यासाठी तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रस्तावित सर्किटचा प्रारंभबिंदू असलेले हेळवाक हे सह्याद्रीच्या या खोऱ्याचे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते. दत्तपरंपरेशी संबंधित धार्मिक महत्त्वामुळे या ठिकाणाला वेगळे स्थान आहे. त्यानंतरचा धनगरवाडा हा कोंढावळे गावातील शेवटचा वस्तीचा टप्पा असून रामघळच्या मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कड्याखाली, मोठ्या धबधब्याच्या मागे लपलेली रामघळ ही निसर्गरम्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची जागा आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याच्या संदर्भामुळे या स्थळाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
वाघणे हे भैरवगड आणि रामघळीकडे जाणाऱ्या मार्गावरील महत्त्वाचे गाव आहे. पुढे येणारा भैरवगड हा शिलाहारकालीन किल्ला असून सह्याद्रीच्या दुर्गवैभवाचा साक्षीदार आहे. २३ मे १८१८ रोजी लेफ्टनंट कर्नल केनेडीने सावर्डे, चिपळूण येथून शंभर सैनिकांची तुकडी पाठवून हा किल्ला जिंकला होता. आजही किल्ल्यावर भैरी, तुळजाई, वाघजाई यांच्या मूर्ती, शिवपिंड, चौकोनी बारमाही विहीर, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तसेच ढासळलेली तटबंदी इतिहासाच्या खुणा जपून आहे. पाथरपुंज हे भैरवगड आणि प्रचितगड यांना जोडणारे महत्त्वाचे जंक्शन ठरते. या मार्गावरील कलावंतीणीची विहीर ही दगडात कोरलेली चौकोनी बारमाही विहीर असून तिचा संबंध चौदाव्या शतकातील बांधकामाशी जोडला जातो. या सर्किटचा निसर्गवैभवाचा कळस म्हणजे कंधारडोह. वारणा नदीवर निर्माण झालेला धबधबा आणि त्याखालील डोह, परिसरातील खडकांची भव्य रचना आणि डोहाच्या वरच्या बाजूला असलेले ‘फ्रोझन लाव्हा’ स्वरूपाचे पठार अर्थात सडा, हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू शकते. या परिसरातून चांदोली धरणाचा विस्तीर्ण आणि मनोहारी परिसरही न्याहाळता येतो.
‘ट्रेकिंग’बरोबरच संवर्धनालाही प्राधान्य
“वनसंवर्धन, ऐतिहासिक वारसा, साहसी पर्यटन, पर्यावरणपूरक उपक्रम, दुर्गभ्रमण आणि निसर्गसहवास ही उद्दिष्टे या सर्किटच्या माध्यमातून साध्य होऊ शकतात,” असे डॉ. नातू यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. सह्याद्रीच्या या दुर्गम पट्ट्याला केवळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याऐवजी निसर्गसंवर्धन, स्थानिक रोजगार, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि सुरक्षित साहसी पर्यटन यांचा समतोल साधणारे मॉडेल उभारल्यास कोकणातील पर्यटनाला नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे शासन या मागणीवर कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता पर्यटक, दुर्गप्रेमी आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे. या मागणीचे पत्र मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर यांनाही पाठविण्यात आले आहे.


