(संगमेश्वर / प्रतिनिधी)
मंडणगड येथील इयत्ता ९ वीमध्ये शिकणाऱ्या १४ वर्षीय अक्षय मोरे याला मध्यरात्री घराच्या छतावरून अंगावर पडलेल्या नागाने पोटावर दंश केला. झोपेत असतानाच सर्पदंश झाल्यानंतर अक्षयला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डोळे उघडता येत नव्हते, तोंडातून लाळ गळत होती, तसेच पोटातही दुखत होते. त्याला तातडीने मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला २५ वायल अँटी-स्नेक व्हेनम देण्यात आले; मात्र उपचारानंतरही त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. उलट श्वसनास अडथळा निर्माण होऊन प्राणवायूचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्याला बी.के.एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे हलविण्यात आले.
डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करताना अक्षयमध्ये पापण्यांचा पडदा पडणे आणि त्यानंतर दुहेरी दिसणे अशी न्यूरोटॉक्सिक विषारी सर्पदंशाची लक्षणे आढळून आली. पुढे त्याला श्वसनाची तीव्र अडचण निर्माण होऊन श्वसनदमन झाले. छातीच्या एक्स-रेमध्ये फुफ्फुसात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याच्या हृदयाची कार्यक्षमताही मंदावली होती. त्यामुळे फुफ्फुसात पाणी साचले होते.
अक्षयची गंभीर अवस्था लक्षात घेऊन वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. त्याला सर्पदंश नाशक औषधे देण्यात आली. अपेक्षित सुधारणा न झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राणवायू, फुफ्फुसातील पाणी कमी करण्यासाठी औषधे, इको कार्डिओग्राफी तसेच अँटी-स्नेक व्हेनम औषधे पुन्हा देण्यात आली. अक्षयची अत्यंत नाजूक प्रकृती लक्षात घेऊन त्याच्यावर अतिदक्षता विभागात विशेष दक्षतेने उपचार करण्यात आले.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीखाली आवश्यक उपचार, श्वसनाचे व्यवस्थापन आणि सपोर्टिव्ह केअर देण्यात आली. उपचारांना प्रतिसाद देत पुढील दोन दिवसांत अक्षयच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. त्याचे डोळे पूर्णपणे उघडू लागले, श्वास घेणे सुलभ झाले आणि हातापायांची हालचालही सुरळीत झाली. दोन दिवसांत त्याची प्रकृती स्थिर झाल्याने अक्षयला जीवदान मिळाले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
अक्षयच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे रुग्णालयातील सर्व उपचार महात्मा फुले योजनेअंतर्गत मिळाल्याने कुटुंबीयांवरील आर्थिक भारही हलका झाला. गंभीर न्यूरोटॉक्सिक सर्पदंश झाल्यानंतरही वेळेत योग्य उपचार मिळाल्याने अक्षयला जीवनदान मिळू शकले. पालकांनी वेळ न दवडता त्याला तातडीने अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखल केल्याने उपचार सुरू करण्यात विलंब झाला नाही आणि अक्षय बरा होऊ शकला.
अक्षयवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी अमित वाधवा, डॉ. संकेत आणि डॉ. श्रीयांस यांचा समावेश होता.
सर्पदंश झाल्यास वेळ न दवडता रुग्णालयात दाखल करा
सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला तात्काळ चांगल्या रुग्णालयात दाखल केल्यास त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सर्पदंशाची घटना घडल्यानंतर वेळ वाया न घालवता रुग्णाला इतरत्र न नेता तात्काळ चांगल्या रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन रुग्णालयाच्या संचालिका सौ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.
फोटो : मंडणगड येथील सर्पदंश झालेला अक्षय डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार घेताना कुटुंबीयांसमवेत फोटो.


