(मुंबई)
भारतीय संगीतसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक असलेल्या अरिजीत सिंगने चित्रपटांसाठी गाणी गाणे थांबवण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच अरिजीतने केलेल्या या घोषणेमुळे बॉलिवूडसह संपूर्ण संगीत क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अरिजीत सिंगने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक संदेश शेअर करत हा निर्णय जाहीर केला. संदेशात त्याने चाहत्यांचे आभार मानत सांगितले की, अनेक वर्षे श्रोत्यांकडून मिळालेले प्रेम आणि पाठिंबा आयुष्यभर लक्षात राहील. मात्र, आता पुढे तो प्लेबॅक सिंगर म्हणून कोणतेही नवीन चित्रपट प्रकल्प स्वीकारणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
अरिजित यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षांत तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्व श्रोत्यांचा मनापासून आभारी आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापासून मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम करणार नाही. मी या प्रवासाचा शेवट करत आहे. हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर आणि संस्मरणीय प्रवास आहे. तुम्हा सर्वांचे आभार.”
चित्रपट संगीतावर होणार परिणाम?
अरिजीत सिंगला सध्याच्या बॉलिवूड संगीताचा कणा मानले जाते. हिंदीसह बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर भाषांमध्ये त्याने 300 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्याच्या आवाजाने अनेक प्रेमकथा, वेदना आणि भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे चित्रपट संगीतासाठी त्याचा हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे.
स्वतंत्र संगीत आणि लाईव्ह कॉन्सर्ट सुरूच राहणार
चित्रपटांसाठी गाणे थांबवत असला तरी अरिजीत सिंग पूर्णपणे संगीतापासून दूर जाणार नाही, असे संकेत आहेत. तो स्वतंत्र संगीत प्रकल्प, लाईव्ह कॉन्सर्ट आणि संगीत मैफिलींच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेला राहणार आहे.
चाहत्यांमध्ये नाराजी आणि भावनिक प्रतिक्रिया
आशिकी 2 मधील “तुम ही हो” या गाण्यापासून सुरू झालेला अरिजीतचा प्रवास अचानक थांबेल, अशी अपेक्षा कुणालाही नव्हती. सोशल मीडियावर अरिजीत सिंग ट्रेंड होत असून अनेक चाहते त्याने हा निर्णय पुनर्विचारावा, अशी मागणी करत आहेत. अनेकांसाठी अरिजीतचा आवाज म्हणजे केवळ गाणे नसून एक भावना आहे.

