(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक मोहीम उघडली असून, नियमांची पायमल्ली करणाऱ्या चार व्यावसायिकांना थेट ‘व्यवसाय बंदी’ची नोटीस बजावण्यात आली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे ४२५ किलो संशयास्पद व असुरक्षित अन्नसाठा, अंदाजे २ लाख ४० हजार रुपये बाजारमूल्याचा, जप्त करण्यात आला असून तो नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, किराणा तसेच विविध खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठी वाढ होते. याच गर्दीचा आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले. या विशेष मोहिमेत हॉटेल, मिठाईची दुकाने, डेअरी आणि किराणा आस्थापनांसह तब्बल २१३ ठिकाणी अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळलेल्या चार व्यावसायिकांविरोधात कठोर भूमिका घेत त्यांना व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. जोपर्यंत संबंधित व्यावसायिक अन्नसुरक्षेचे आवश्यक निकष पूर्ण करीत नाहीत, तोपर्यंत व्यवसाय सुरू करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणारा सुमारे ४२५ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. त्याची बाजारातील किंमत सुमारे २ लाख ४० हजार रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा साठा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अन्नाच्या दर्जाशी तडजोड करून नफा कमावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही कारवाई स्पष्ट इशारा मानली जात आहे. ग्राहकांच्या ताटात काय वाढले जात आहे, याची जबाबदारी केवळ ग्राहकांची नसून विक्रेत्यांची आणि संबंधित यंत्रणेचीही आहे. त्यामुळे सणासुदीच्या गर्दीचा फायदा घेत निकृष्ट अथवा असुरक्षित अन्नपदार्थ बाजारात आणणाऱ्यांवर कारवाईची धार कायम ठेवणे गरजेचे आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचे ११९ नमुने संकलित करून प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. या अहवालानंतर नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासन निरीक्षक तप्ती घरत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी निगडित बाबतीत प्रशासनाने घेतलेली ही कठोर भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
सण आला की ग्राहकांची गर्दी वाढते आणि त्याचबरोबर काहींच्या नफेखोरीलाही उधाण येते. मात्र, ग्राहकांच्या आरोग्याची किंमत मोजून व्यवसाय करण्याचा अधिकार कोणालाही नाही. चार व्यावसायिकांना बजावलेली ‘व्यवसाय बंदी’ची नोटीस ही केवळ कारवाई न राहता नियम धाब्यावर बसविणाऱ्यांसाठी इशाराच ठरावा. पुढील काळातही तपासण्या केवळ कागदोपत्री न राहता दोषींवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई झाली, तरच ‘सुरक्षित अन्न’ हा नागरिकांचा अधिकार प्रत्यक्षात जपला जाईल.


