(रत्नागिरी / वार्ताहर)
बदलते हवामान, समुद्रातील घटती मासळीची उपलब्धता आणि मासेमारीतील वाढती अनिश्चितता यामुळे पारंपरिक मच्छीमारांसमोर आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. अशा परिस्थितीत मत्स्यपालकांसाठी आशादायी ठरणारे महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय खाडीजल जलसंवर्धन संस्थेने (ICAR-CIBA) उच्च बाजारमूल्य असलेल्या ‘गोल्डलाईन सीब्रीम’ माशाची नियंत्रित वातावरणात कृत्रिम पैदास करण्यात यश मिळविले आहे. या संशोधनामुळे कोकणातील खाडी क्षेत्र, किनारपट्टीवरील खाऱ्या पाण्याचे तलाव आणि केज कल्चरच्या माध्यमातून या माशाच्या व्यावसायिक संगोपनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
पिवळ्या आणि सोनेरी पट्ट्यांमुळे सहज ओळखला जाणारा गोल्डलाईन सीब्रीम चवीला रुचकर असून बाजारपेठेत त्याला मागणी आहे. मऊ आणि स्वादिष्ट मांस हे या माशाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. सध्या स्थानिक बाजारपेठेत त्याला प्रतिकिलो सुमारे ४०० ते ६०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने त्याचे व्यावसायिक उत्पादन मत्स्यपालकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
यापूर्वी गोल्डलाईन सीब्रीम प्रामुख्याने समुद्र आणि खाडीतील नैसर्गिक स्रोतांमधून उपलब्ध होत होता. मात्र, ICAR-CIBAच्या शास्त्रज्ञांनी चेन्नई येथील प्रयोगशाळेत नियंत्रित वातावरणात आवश्यक संप्रेरकांचा वापर करून या माशाचे यशस्वी फलन घडवून आणले. त्यातून मोठ्या प्रमाणात डिंभांची निर्मिती करण्यात आली आहे. कृत्रिम बीजनिर्मितीच्या दृष्टीने या प्रयोगाचे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
कोकणासाठी या संशोधनाचे महत्त्व अधिक आहे. खाडीतील क्षारतेतील बदल आणि पाण्याचे विविध स्तर सहन करण्याची क्षमता गोल्डलाईन सीब्रीममध्ये असल्याने कोकणातील नैसर्गिक परिस्थितीत त्याचे संगोपन करण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. खाडीतील मत्स्यशेती, किनारपट्टीवरील खाऱ्या पाण्याचे तलाव तसेच समुद्रातील केज कल्चरमध्ये या माशाचे पालन करता येण्याची शक्यता आहे. कृत्रिम खाद्याला मिळणारा चांगला प्रतिसाद आणि वाढीचा समाधानकारक वेग यामुळे व्यावसायिक मत्स्यपालनासाठीही हा मासा उपयुक्त ठरू शकतो.
हवामान बदलामुळे पारंपरिक समुद्री मासेमारीसमोर निर्माण झालेली आव्हाने आणि उत्पन्नातील अनिश्चितता लक्षात घेता कोकणातील अनेक तरुण पर्यायी व्यवसाय म्हणून खाडीतील मत्स्यशेतीकडे वळत आहेत. अशा वेळी गोल्डलाईन सीब्रीमचे कृत्रिम बीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यास मत्स्यपालकांना दर्जेदार मत्स्यबीज मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हॅचरीच्या माध्यमातून सातत्याने बीजनिर्मिती करता आल्यास नैसर्गिक स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासही मदत होऊ शकते.
स्थानिक परिस्थितीचा विचार करून या तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर झाल्यास कोकणातील खाडी क्षेत्राला उत्पादनक्षम मत्स्यशेतीचे नवे केंद्र विकसित करण्याची क्षमता आहे. मत्स्यपालनाबरोबरच बीजनिर्मिती, खाद्यनिर्मिती, संगोपन, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री अशा संपूर्ण साखळीत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गोल्डलाईन सीब्रीमची कृत्रिम पैदास हे केवळ एका माशाच्या उत्पादनापुरते मर्यादित न राहता कोकणातील पारंपरिक मच्छीमारांना पर्यायी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणाऱ्या शाश्वत मत्स्यशेतीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते.


