(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जैतापूर फाट्याजवळ उनाड गुरांनी चक्क रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मांडल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची वर्दळ वाढत असतानाच महामार्गावर गुरांचा मुक्त संचार सुरू असल्याने प्रशासनाच्या ‘दुर्लक्षाचा महामार्ग’ नेमका कधी संपणार?, असा सवाल उपस्थित होत आहे.
जैतापूर फाट्याजवळ महामार्गाच्या मध्यभागीच गुरे बसून राहत असल्याचे चित्र दिसत आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक गुरे आल्यास चालकाला वाहनावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊ शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी ही गुरे वाहनचालकांच्या नजरेस उशिरा पडल्यास क्षणभराच्या चुकीची किंमत एखाद्या निष्पाप प्रवाशाला जीव गमावून मोजावी लागू शकते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून हजारो चाकरमानी रस्त्याने कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत महामार्गाच्या मध्यभागी गुरांचा ठिय्या हा केवळ वाहतुकीतील अडथळा नसून थेट अपघाताला निमंत्रण देणारा धोकादायक प्रकार ठरत आहे.
महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बैठका, सूचना आणि उपाययोजनांची चर्चा मोठ्या प्रमाणावर केली जाते; मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर गुरे हाकण्यासाठी किंवा त्यांना महामार्गापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा कुठे आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अपघात घडल्यानंतर पंचनामा आणि मदतकार्य करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे प्रशासनाची जबाबदारी नाही का? असा सवाल वाहनचालकांकडून केला जात आहे. महामार्गावरील अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून उनाड गुरांचा बंदोबस्त करावा आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी आता मागणी होत आहे.


