(बीड)
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज (शनिवार) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा जणांना भरधाव कंटेनरने चिरडले. या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून पायी जात असलेल्या सहा लोकांना भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. अपघातानंतर जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
प्राथमिक चौकशीत समोर आले की, सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र मार्गातच हा अपघात झाला. मृत आणि जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. स्थानिक पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

