(गुहागर)
गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील घरटवाडी परिसरात जमिनीच्या वादातून वृद्ध दाम्पत्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न झाल्याने गुहागर पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. न्याय न मिळाल्यास 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा भुवड कुटुंबियांनी दिला असून अखेर आजपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
या घटनेत गणपत धाकू भुवड (वय 69) आणि त्यांची पत्नी शालिनी भुवड यांच्यावर लाकडी बांबू आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गणपत भुवड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पांडुरंग रघुनाथ भुवड (वय 60) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर, अजामीनपात्र कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहूनही अद्याप अटक करण्यात आलेली नाही किंवा कोणतीही कायदेशीर नोटीसही बजावण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपी आणि त्याचे साथीदार गुहागर-रानवी परिसरात मोकाट फिरत असून पीडित कुटुंबीय दहशतीखाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोपींकडून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे भुवड कुटुंबियांचे म्हणणे आहे.
या प्रकरणामागे गुहागर न्यायालयात प्रलंबित असलेला जमिनीचा वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयीन वाद सुरू असतानाही संशयित आरोपीने कामगारांसह फिर्यादींच्या घरासमोरील बांध फोडण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यावर गणपत भुवड आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला, शिवीगाळ आणि धमक्यांचा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, पोलिसांकडून तपासाच्या नावाखाली कारवाईला होत असलेल्या विलंबामुळे संताप व्यक्त केला जात असून भुवड कुटुंबियांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

