(गुहागर)
गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावच्या शिवसेना (शिंदे गट) युवतीसेना तालुका प्रमुख, नामवंत वकील आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणाऱ्या ॲड. जोत्स्ना विनय काताळकर यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी ठाकरे सेनेत घरवापसी करणाऱ्या ॲड. काताळकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच गुहागर पंचायत समितीच्या शीर गणासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
ॲड. जोत्स्ना काताळकर यांच्या प्रवेशामुळे गुहागर तालुक्यात ठाकरे सेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

