(रत्नागिरी / वार्ताहर)
तांत्रिक बिघाडामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून समुद्रात अडकून भरकटलेल्या ‘धनलक्ष्मी’ मच्छीमार नौकेला अखेर रविवारी (ता. ६) सुरक्षितपणे मिरकरवाडा जेट्टीवर आणण्यात आले. स्थानिक मच्छीमार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नौकेवरील ८ खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणणे शक्य झाले.
‘धनलक्ष्मी’ नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्यानंतर अचानक तिच्यात तांत्रिक बिघाड झाला. इंजिन सुरू होत नसल्याने नौका समुद्राच्या लाटांवर भरकटत रत्नागिरी आणि पावसाच्या दरम्यानच्या भागात पोहोचली होती. त्यातच संपर्क तुटल्याने नौकेवरील खलाशी आणि मालक यांच्यासमोर मदतीचे आव्हान निर्माण झाले. मदत मिळवण्यासाठी त्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मच्छीमारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नौका समुद्रात अडकल्याची माहिती प्रसारित करण्यात आली.
ही माहिती मिळताच कोकण संघटकचे ताहीर मुल्ला यांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्यासोबत नावीद कनवडकर, मतीन डोंगरकर, सुहेल साखरकर, अल्ताफ साखरकर आणि नुरुल शेठ यांनी रात्रभर शोध व मदत मोहीम राबवली. दरम्यान, मत्स्य विभागाचे अधिकारी चिन्मय, होमगार्ड तसेच इतर कर्मचाऱ्यांनीही नौकेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
अखेर रविवारी (ता. ६) सकाळी नौकेचे इंजिन सुरू करण्यात खलाशांना यश आले. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ‘धनलक्ष्मी’ नौका सुरक्षितपणे मिरकरवाडा जेट्टीवर आणण्यात आली.
नौका जेट्टीवर पोहोचल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबईहून आलेल्या बोट मालकाची आणि खलाशांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या जेवणासह इतर व्यवस्था करण्यात आली आणि त्यांना धीर देण्यात आला, अशी माहिती सुहेल साखरकर यांनी दिली.


