(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आखाती प्रदेशातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागले आहेत. इंधन टंचाई आणि वाढत्या इंधनदरांमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ, त्यातच तीव्र उष्णतेमुळे घटलेली भूजलपातळी आणि पाणीटंचाई यांचा दुहेरी फटका भाजीपाला उत्पादन व पुरवठा साखळीला बसला आहे. परिणामी, जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याच्या दरांनी मोठी उसळी घेत ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या भागांतून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला दाखल होतो. मात्र इंधनदरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने परजिल्ह्यातून होणारी आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. दुसरीकडे स्थानिक पातळीवरही पाणीअभावी भाजीपाला पिकांची उत्पादकता कमी झाल्याने बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मागणीच्या तुलनेत उपलब्धता घटल्याने दरांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या घेवडा, गवार, फरसबी आणि हिरवी मिरची या भाज्या तब्बल १२० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत. भेंडीचा दर ९० ते १०० रुपये, तर सिमला मिरची ८० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. फ्लॉवरच्या एका गड्यासाठीही ग्राहकांना ८० रुपये मोजावे लागत असून, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर भाजीपाला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
भाजीपाल्याच्या वाढत्या दरांमध्ये कांदा आणि बटाटा हेच काहीसे स्थिर असल्याचे चित्र आहे. कांदा १५ ते २० रुपये, तर बटाटा २० ते २५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मात्र लसणाच्या दरात मोठी वाढ झाली असून तो २०० ते २३० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीस आहे. दरम्यान, साठवणुकीचा जुना कांदा नवीन माल असल्याचे सांगून विक्री केल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत. दरवाढीचा सर्वाधिक फटका टोमॅटोला बसला असून, बाजारात त्याची आवक कमी झाल्याने दर ६० ते ७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या पंधरवड्यात टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने गृहिणींचे घरगुती अर्थकारण कोलमडले आहे. वाढत्या किमतीमुळे अनेकांनी टोमॅटोऐवजी टोमॅटो प्युरीचा वापर सुरू केला असून, काहींनी तर टोमॅटोचा वापर मर्यादित करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
सर्वसामान्यांच्या ताटातील भाजी महाग
इंधनदरवाढ, पाणीटंचाई आणि घटलेला पुरवठा या त्रिसूत्रीमुळे भाजीपाल्याच्या दरवाढीचे संकट अधिक तीव्र झाले आहे. आगामी काळात परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी व शेतकरी वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच महागाईच्या विळख्यात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातील भाजी आणखी महाग होण्याची चिन्हे दिसत आहेत.

