(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यात डीजे आणि अनधिकृत ध्वनिक्षेपकांविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट सध्या त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीसोबतच शुद्ध, समृद्ध आणि संस्कृतप्रचुर मराठी भाषेमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या भाषेचे थेट मुख्यमंत्र्यांनीही विशेष कौतुक केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी अस्खलितपणे उच्चारलेले ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्…’ हे संस्कृत सुभाषित आणि त्यासोबतची कडक, तार्किक व अभ्यासपूर्ण मराठी मांडणी यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना थेट ‘मराठीतले शशी थरूर’ अशी उपमा दिली आहे.
मात्र, बापट यांच्या भाषेची चर्चा केवळ त्यांच्या शब्दसंपदा किंवा संस्कृतवरील प्रभुत्वापुरती मर्यादित राहत नाही. त्यांच्या बोलण्यातून भाषेची शास्त्रीय रचना, तिच्यामागील Linguistic Science आणि बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचे असलेले महत्त्वही अधोरेखित होते. त्यामुळे त्यांच्या भाषिक शैलीची सोशल मीडियावर होत असलेली चर्चा ही केवळ कौतुकाची बाब न राहता, मराठी भाषेच्या सामर्थ्याची आणि तिच्या आधुनिक संदर्भातील उपयुक्ततेचीही नव्याने जाणीव करून देणारी ठरत आहे. ते एक सामान्य जागरूक नागरिक असून विविध सामाजिक आणि परिवर्तनवादी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याशीही ते जोडलेले आहेत.
कोणत्याही विषयावर अचूक दाखले देत प्रभावीपणे भूमिका मांडण्याची त्यांची हातोटी नेमकी कशी विकसित झाली, यामागील वैचारिक जडणघडण कशी झाली, याबाबत त्यांचे वडील सुहास बापट यांनी माहिती दिली. विद्यानंद एका खासगी कंपनीत (बीपीओ क्षेत्रात) कार्यरत असून त्यांचे काम प्रामुख्याने ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने चालते.
बापट कुटुंब मूळचे पुणेकर आहे. विद्यानंद यांचे बालपण तसेच प्राथमिक आणि सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच झाले. पहिली ते चौथीपर्यंत त्यांनी नवीन मराठी शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर रमणबाग प्रशालेत नववीपर्यंतचे शिक्षण झाले. कौटुंबिक कारणांमुळे पुढे बापट कुटुंब रत्नागिरीतील मूळ गावी स्थायिक झाले. फाटक हायस्कूलमधून नववी-दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यानंद यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध गोगटे महाविद्यालयातून वाणिज्य शाखेचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
विद्यानंद यांच्या भाषेवरील प्रभुत्वामागे लहानपणापासून जोपासलेली वाचनाची सवय महत्त्वाची ठरल्याचे सुहास बापट यांनी सांगितले. इयत्ता दुसरीपासूनच त्यांना पुस्तकांच्या वाचनाची गोडी लागली होती. पुण्यात वास्तव्यास असताना ते मराठी ग्रंथालयात तासन् तास बसून पुस्तके वाचत आणि त्यातील विचारांवर मनन करत असत. एस. एम. जोशींचे साहित्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटनेवरील लेखन तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. विविध विचारसरणींच्या साहित्याचे वाचन करून त्याचा अभ्यास करण्याची सवयच पुढे त्यांच्या विचारांची आणि भाषेची ताकद बनली, असे सुहास बापट यांनी स्पष्ट केले.
विद्यानंद यांच्या भाषा कौशल्यासोबतच त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि धाडसाचेही सुहास बापट यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ‘आम्ही काही वेगळे बाळकडू दिले नाही. तो लहानपणापासूनच स्वतः मन लावून वाचायचा आणि विचार करायचा. खरे सांगायचे, तर ही त्याच्यातील एक दैवी शक्तीच आहे. त्याची जिद्द, चिकाटी आणि धाडस यामुळेच तो आज कोणत्याही विषयावर अत्यंत अभ्यासू आणि रोखठोक भूमिका मांडू शकतो.’
आज संपूर्ण महाराष्ट्रात विद्यानंद बापट यांच्या समृद्ध मराठी भाषेची चर्चा आणि कौतुक होत असले, तरी या भाषिक संपन्नतेची आणि वैचारिक क्षमतेची मूळ पायाभरणी त्यांच्या बालपणीच्या वाचनसंस्कृतीतच झाली असल्याचे सुहास बापट यांनी सांगितले.
विद्यानंद बापट यांच्या मुलाखती आणि चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या. त्यांचा न अडखळता सलग आणि स्पष्ट बोलण्याचा प्रवाह पाहून अनेकांनी त्यांच्या भाषेच्या अभ्यासाचे कौतुक केले आहे, तर काही स्तरातून त्यांच्या या भूमिकेवर विरोधही दर्शवला जात आहे.


