(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहराजवळील फणसोप सडा परिसरातील मुख्य रस्त्याच्या कडेला गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधी, माशा आणि अस्वच्छतेमुळे परिसर दुर्गंधीमय झाला आहे. प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
घरगुती कचरा, प्लास्टिक पिशव्या घरगुती ओला सुखा कचरा उघड्यावर टाकले जात असल्याने परिसरात घाण व अस्वस्थ वातावरण निर्माण झाले आहे. दिवसभर या रस्त्याने वाहतूक सुरू असताना कचऱ्याचा ढीग दिसून येतो. आजवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट दिवसेंदिवस कचऱ्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली कोट्यवधींचे निधी खर्च होत असताना, फणसोप सडा येथील रस्त्यालगतचे दृश्य मात्र स्वच्छतेला चक्क काळिमा फासणारे आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

