( सातारा )
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावच्या हद्दीतील एका विहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात सातारा पोलिसांना अवघ्या ७२ तासांत यश आले आहे. मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून नियोजनपूर्वक तरुणाची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणंद पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका विहिरीत २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात मृत तरुणाची ओळख सोमनाथ कल्याण बोबडे (रा. सेक्टर २०, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) अशी पटली. घातपाताचा संशय असल्याने लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि पुढील तपास सुरू करण्यात आला.
फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित वाहनाचा शोध घेतला. तपासादरम्यान एका होंडा सिटी कारचा माग काढण्यात आला, ज्यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
सलग तीन दिवसांच्या कठोर तपासानंतर आरोपींनी कळंबोली येथे नियोजनपूर्वक कट रचून सोमनाथ बोबडे याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बंडू बापू भिसे (रा. कळंबोली, मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण), विजय पोपटराव पवार (रा. साखरवाडी, ता. फलटण), किरण विकास गायकवाड (मूळ रा. होळ, ता. फलटण, हल्ली रा. पुणे) आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (रा. चुरमापुरी, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा. धायरी, पुणे) या चौघांना अटक केली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी सोमनाथ बोबडे याला कळंबोली येथे जबरदस्तीने होंडा सिटी कारमध्ये (MH-12 DY 8846) बसवले. त्याचे हातपाय दोरीने बांधून गाडीतच गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. खून केल्यानंतर मृतदेह कारमधून सातारा जिल्ह्यातील सुखेड गावात आणण्यात आला. तेथे पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून अर्धवट जळालेल्या अवस्थेत विहिरीत टाकण्यात आला. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली होती.
घटनेची गंभीरता लक्षात घेता सातारा पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या ७२ तासांत या खुनाचा छडा लावला. मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा खून केल्याची कबुली आरोपींकडून मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सातारा पोलीस करत आहेत.

