(रायगड / वृत्तसंस्था)
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वरची भागुची वाडी अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या अमृत आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या अनियमिततेची वरिष्ठांकडे तक्रार करणाऱ्या अंगणवाडी मदतनीस उर्मिला पारधी यांनी मानसिक छळाला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकात्मिक बाल विकास विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या उर्मिला पारधी यांनी प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना कर्जत आणि अलिबाग कार्यालयाकडे तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारींमध्ये अंगणवाडी सेविका बीजी निरगुडा यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पारधी यांच्या म्हणण्यानुसार, गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या अमृत आहाराच्या वितरणात अनियमितता झाली असून, लाभार्थ्यांच्या नावावर आहार वितरित केल्याचे दाखवून प्रत्यक्षात तो न दिल्याचे प्रकार घडले आहेत.
तक्रारीनुसार, अंगणवाडीत वितरित करण्यात येणारी डाळ सडलेली आणि कीड लागलेली होती. साखरेमध्ये उंदराची विष्ठा आढळूनही ती वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मुलांना आहारामध्ये देण्यात येणारी केळी खराब असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाच्या अन्नाचे छायाचित्रे पुरावा म्हणून वरिष्ठांकडे सादर केल्याचा दावा उर्मिला पारधी यांनी केला आहे.
याशिवाय, गावातील एका गरोदर महिलेचे आधार कार्ड नसल्याचे कारण देऊन तिला अमृत आहार न देता तिच्या नावावर आहार वितरण दाखविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना सातत्याने शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे उर्मिला पारधी यांनी सांगितले.
या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी सुमारे महिनाभरापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील एका अंगणवाडी शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत त्या शिक्षिकेने प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वरची भागुची वाडी अंगणवाडीतील अमृत आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रार समोर आल्याने एकात्मिक बाल विकास विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


