(रत्नागिरी / वार्ताहर)
ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्गाच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी परिवाराच्या वतीने स्वच्छता मोहीम क्रमांक ९० आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता किल्ले रत्नदुर्ग येथे पार पडणार आहे. या मोहिमेदरम्यान किल्ला परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे, गवत तसेच कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्याचे कार्य करण्यात येणार आहे.
गड-किल्ले हे आपल्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे अमूल्य ठेवे आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. याच उद्देशाने राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी परिवाराच्या वतीने सातत्याने स्वच्छता व संवर्धनाच्या मोहिमा राबवून गडप्रेमी आणि नागरिकांना या कार्यात सहभागी करून घेतले जात आहे.
किल्ले रत्नदुर्गाच्या ९० व्या स्वच्छता मोहिमेत शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, युवक, नागरिक तसेच इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
🚩 चला, ‘शिव’ कार्य करूया…! गड स्वच्छ ठेवूया इतिहास जपूया, वारसा संवर्धित करूया!

