(शिर्डी / वृत्तसंस्था)
साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. साईदर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर पडताना साईबाबा संस्थानच्या वतीने सर्व भक्तांना बुंदीचा प्रसाद वितरित केला जातो. मात्र, हा गोड प्रसाद मंदिर परिसरातील भटक्या श्वानांना खाऊ घालणे त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने, भाविकांनी श्वानांना बुंदीचा प्रसाद देऊ नये, असे कळकळीचे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्तांना केले आहे.
साईबाबांनी सर्व प्राणीमात्रांवर दया करण्याची आणि त्यांच्यामध्ये ईश्वराचे रूप पाहण्याची शिकवण दिली आहे. याच श्रद्धेतून अनेक साईभक्त साईबाबांच्या दर्शनानंतर मिळणारा बुंदीचा प्रसाद मंदिर परिसरातील श्वानांना खायला घालतात. मात्र, प्रसादातील गोडवा आणि तेलकट घटकांमुळे या मुक्या प्राण्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. श्वानांनी बुंदीचा प्रसाद खाल्ल्यामुळे त्यांच्यात आजारपण आणि विविध व्याधी वाढण्याचे प्रमाण दिसून आले आहे.
संस्थानच्या माध्यमातून या श्वानांवर वेळोवेळी वैद्यकीय उपचार केले जात असले, तरी हा त्रास मुळातून रोखण्यासाठी त्यांचा आहार योग्य असणे गरजेचे आहे, असे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले आहे.
प्राण्यांवरील दयाभाव जपत असतानाच त्यांच्या आरोग्याची हानी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे साईबाबा मंदिर परिसरात आणि आसपास असणाऱ्या भटक्या प्राण्यांना बुंदीचा प्रसाद खाण्यास देऊ नये. साईभक्तांनी संस्थानच्या या आवाहनाची गंभीर दखल घेऊन मुक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे. तसेच, साईबाबा मंदिर परिसरातही संस्थानच्या वतीने ठिकठिकाणी याबाबतचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत.
श्वानांना होतोय मधुमेह
गोड पदार्थ खाल्ल्याने श्वानांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून त्यांना मधुमेहासारखा आजार होत असल्याचे पशुवैद्यक डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्वचेचे रोग होतात आणि ते सुस्त बनतात. रक्तातील साखर वाढल्यामुळे श्वानांची शारीरिक हालचाल कमी होऊन ते लठ्ठ होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी सेवाभावी संस्था आणि भाविकांनी सुस्त झालेल्या मंदिर परिसरातील श्वानांना उपचारासाठी आणले होते. त्यांची क्लिनिकल लक्षणे पाहिल्यानंतर तसेच रक्त तपासणी केल्यानंतर त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले आहे. गोड पदार्थ हे प्राण्यांचे नैसर्गिक अन्न नसल्याने सर्व भाविकांनी श्वान आणि मांजरांना साखर किंवा गोड अन्नपदार्थ खाऊ घालणे टाळावे, असे आवाहन शिर्डी येथील पशुवैद्यक डॉक्टरांनी केले आहे.

