( रत्नागिरी /प्रतिनिधी )
अज्ञात मृतदेहांना ओळख मिळवून देण्यापासून ते बेपत्ता व्यक्ती आणि फरार आरोपींच्या शोधाला तंत्रज्ञानाची साथ देणाऱ्या रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या ‘RAIDS’ या AI आधारित अभिनव ॲपने राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’च्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तंत्रज्ञानाधिष्ठित आधुनिक पोलिसिंगच्या दृष्टिकोनाला अनुसरून विकसित करण्यात आलेल्या या ॲपला ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक मिळाला आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या उपक्रमाचा हा राष्ट्रीय गौरव मानला जात आहे.
पोलिस तपासात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची संकल्पना बगाटे यांनी प्रत्यक्षात आणली. अज्ञात व बेवारस मृतदेहांची ओळख पटविणे, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे तसेच पाहिजे व फरार आरोपींसह विविध गुन्ह्यांतील आरोपींचे चेहरे उपलब्ध माहितीच्या आधारे पुनर्निर्मित करून तपासाला दिशा देणे, या उद्देशाने रेडस ॲप विकसित करण्यात आले आहे. या अभिनव संकल्पनेमागे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर पोलिस तपासातील प्रत्यक्ष अडचणींची जाण आणि त्या समस्यांवर उपाय शोधण्याची धडपड आहे. या ॲपच्या विकासासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः दिवस-रात्र मेहनत घेतली. संकल्पनेपासून तिच्या प्रत्यक्ष कार्यप्रणालीपर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे RAIDS हे केवळ एक ॲप न राहता पोलिस तपासासाठी उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञानाधारित साधन बनले आहे.
अज्ञात मृतदेहाची अवस्था खराब असल्याने चेहरा ओळखणे अनेकदा अशक्य होते. अशा वेळी उपलब्ध छायाचित्रे आणि अन्य माहितीच्या आधारे AI तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. संभाव्य चेहरा पुनर्निर्मित करून संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याच्या तपासाला त्यातून मदत मिळते. याशिवाय बेपत्ता व्यक्ती, पाहिजे आरोपी, फरार आरोपी तसेच विविध गुन्ह्यांतील आरोपींच्या उपलब्ध छायाचित्रांच्या आधारे चेहऱ्याचे १०८ विविध डिजिटल प्रतिरूपे तयार करता येतात. जुने छायाचित्र, मूळ छायाचित्र उपलब्ध नसणे किंवा कालांतराने चेहऱ्यात झालेले बदल अशा परिस्थितीतही शोधाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न या प्रणालीद्वारे करता येतो.
१४ मृतदेहांची ओळख; ११ बेपत्ता व्यक्तींचा शोध
RAIDS ॲपची उपयुक्तता केवळ कागदावर राहिलेली नसून त्याचे प्रत्यक्ष परिणामही समोर आले आहेत. ॲपवर आतापर्यंत १५३ बेवारस प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ बेवारस व कुजलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात आल्या. यातील १४ प्रकरणांत ओळख पटविण्यात यश आले. जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस प्रकरणांपैकी सात प्रकरणांतही ओळख पटविण्यात ॲपची मदत झाली. तसेच ॲपवर ३८१ बेपत्ता व्यक्तींची नोंद करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ११ बेपत्ता व्यक्तींच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा शोध घेण्यात यश आले आहे.
हैदराबादमध्ये सादरीकरण; आता राष्ट्रीय गौरव
RAIDS ॲपचे सादरीकरण सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA), हैदराबाद येथे करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा पोलिस तपासात परिणामकारक वापर करणाऱ्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आणि प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत त्याला तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळाला. या ॲपच्या निर्मितीत पोलीस अंमलदार अभिजीत दळवी (पोलीस तंत्रज्ञ) तसेच तंत्रज्ञ जितेश जैस्वाल आणि रितेश जैस्वाल यांचे महत्त्वपूर्ण तांत्रिक योगदान राहिले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष तंत्रज्ञानाधारित कार्यप्रणालीचे रूप देण्यात या विकास पथकाची भूमिका मोलाची ठरली. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचेही सहकार्य या उपक्रमाला लाभले.
‘तपास’ आता केवळ फाइलमध्ये नाही, तर तंत्रज्ञानाच्या पडद्यावर
गुन्हेगारी तपासात पारंपरिक पद्धतींची जागा न घेता त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची भक्कम साथ देण्याचा RAIDSचा प्रयत्न आहे. एखाद्या अनोळखी मृतदेहाला नाव मिळवून देणे किंवा हरवलेल्या व्यक्तीला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचविणे, या मानवी संवेदनशीलतेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आली आहे. पोलिसिंगमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा भविष्यातील गरज ठरणार असताना रत्नागिरी पोलिसांनी त्याची प्रायोगिक नव्हे, तर प्रत्यक्ष परिणाम दाखविणारी सुरुवात केली आहे. नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीतून आणि विकास पथकाच्या तांत्रिक योगदानातून साकारलेले RAIDS ॲप प्रधानमंत्री सिल्व्हर कपमध्ये देशात तृतीय क्रमांक पटकावते, ही बाब रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नाविन्यपूर्ण कार्याला राष्ट्रीय अधोरेखित करणारी ठरली आहे. अज्ञात चेहऱ्याला ओळख, हरवलेल्या व्यक्तीला शोध आणि तपासाला तंत्रज्ञानाची धार RAIDSच्या माध्यमातून रत्नागिरी पोलिसांनी आधुनिक पोलिसिंगच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आता राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचले आहे.

