(रत्नागिरी /प्रतिनिधी)
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतरही जिल्ह्यातील इंधन पंपांवरील गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत नसून, संभाव्य इंधन टंचाईच्या भीतीने वाहनचालकांकडून ‘टँक फुल्ल’ करण्याकडे कल वाढल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेलबरोबरच सीएनजीसाठीही शहरातील पंपांवर दिवसरात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनानंतर इंधन टंचाईची शक्यता व्यक्त करत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पंप सुरू होताच वाहनचालक मोठ्या संख्येने पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी गर्दी करत आहेत. रत्नागिरी शहरासह जिल्हाभरातील बहुतांश पंपांवर दिवसभर वाहनांच्या रांगा कायम आहेत. अनेक वाहनचालक वाहनांची टाकी पूर्ण भरून घेत असल्याने पंपांच्या दैनंदिन साठ्यावर ताण येऊ लागला आहे. एरव्ही रात्रीपर्यंत उपलब्ध राहणारा इंधनसाठा आता दुपारपर्यंतच संपत असल्याची माहिती काही पंपचालकांनी दिली. त्यामुळे अनेक पंप दुपारीच बंद ठेवण्याची वेळ येत असल्याचेही समोर आले आहे.
रात्री टँकर दाखल होणाऱ्या पंपांवर तर उशिरापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. काही नागरिक कामे बाजूला ठेवून तासनतास रांगेत उभे राहत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. दरम्यान, रत्नागिरीतील बहुतांश रिक्षा सीएनजीवर धावत असल्याने सीएनजी पंपांवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. मिरजोळे येथील २४ तास सुरू असलेला मुख्य सीएनजी पंप कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणप्रकरणानंतर बंद असल्याने माळनाका येथील पंपावर अतिरिक्त भार पडत आहे. या पंपावर दिवसा तसेच रात्री उशिरापर्यंत रिक्षांच्या रांगा मारुती मंदिर परिसरापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे.
शुक्रवारपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर सुमारे पावणेचार रुपयांनी, तर डिझेलच्या दरात ३.०४ रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, दरवाढ असूनही प्रवासाची अपरिहार्यता आणि टंचाईची भीती यामुळे वाहनचालकांची गर्दी कायम असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारनंतर शहरातील काही पंप सायंकाळपर्यंत बंद ठेवावे लागले. रात्री माळनाका येथे टँकर दाखल होताच पुन्हा वाहनचालकांनी मोठी गर्दी केली.
‘दर वाढले तरी टँक फुल्लच!’
दरवाढीनंतरही नागरिकांमध्ये ‘इंधन उपलब्ध असतानाच साठवून ठेवावे’ अशी मानसिकता वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहनचालक सर्रास वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेत असून, पंपांवरील गर्दी आणखी वाढत आहे.

