आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर सोमवारी दुपारपासून ‘मोंथा’ या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला. सोमवार रात्रीपासून किनारी भागात मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर वाढला. या वादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व स्तरावर सतर्कता बाळगली आहे. बाधित भागांमध्ये अधिकारी सतत भेटी देत असून, मदत व पुनर्वसनाची व्यवस्था सुरू आहे.
आंध्रात एकाचा मृत्यू, ओडिशात जनजीवन विस्कळीत
मंगळवारी आंध्र प्रदेशच्या कोनासीमा जिल्ह्यातील मकानागुडेम गावात झाड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशामधील १५ जिल्ह्यांपर्यंत जाणवला असून, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.
किनारपट्टीवर उच्च सतर्कता
चक्रीवादळ जवळ येताच किनारी भागातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. काकीनाडा बंदरावर १० क्रमांकाचा मोठा धोक्याचा सिग्नल दाखवण्यात आला असून, हा सर्वात उच्च स्तराचा इशारा मानला जातो. उंच भरतीच्या लाटांमुळे उप्पाडा-काकीनाडा समुद्रकिनारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
विशाखापट्टणम, गंगावरम, कलिंगपट्टणम आणि भीमुनीपट्टणम बंदरांवर ९ क्रमांकाचा मोठा धोका सिग्नल, तर मच्छलीपट्टणम, निजामपट्टणम, कृष्णपट्टणम आणि वदरेवु बंदरांवर ८ क्रमांकाचा सिग्नल दाखवण्यात आला आहे. मच्छीमारांना पुढील पाच दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वादळाचा वेग आणि पुढील दिशा
भारतीय हवामान विभागानुसार, ‘मोंथा’ हे चक्रीवादळ काकीनाडाभोवती मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणमदरम्यान आंध्र किनाऱ्यावरून जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग प्रतितास ९० ते ११० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. प्रशासनाने नुकसान टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून, पूरग्रस्त भागातील लोकांच्या सुरक्षित स्थलांतराची व्यवस्था केली आहे.
‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विदर्भात २९ व ३० ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूरमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाकडून या भागात ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

