(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बौद्धवाडी येथील प्रणय नंदराज मोहिते (वय २५) याचा अचानक छातीत व पाठीत वेदना होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी सुमारे १०.३० वाजता घडली.
आज सकाळी प्रणय याला अस्वस्थ वाटू लागले व छातीत तसेच पाठीत वेदना जाणवल्याने त्याची आई व चुलत भाऊ अजित रामचंद्र मोहिते यांनी त्याला प्रथम डॉ. लोहिया यांच्या दवाखान्यात नेले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर प्रणय याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती अजित मोहिते यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली असून महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. व्ही. कोष्टी यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय मनवल करत आहेत.