( मुंबई / वृत्तसंस्था )
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेत पक्षाच्या नव्या १० प्रवक्त्यांची घोषणा केली आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी नव्या प्रवक्त्यांची टीम तयार करण्यात आली आहे.
शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना, आगामी राजकीय परिस्थिती आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजिया खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीत अनुभवी नेत्यांसोबतच पक्षाची भूमिका आक्रमक आणि प्रभावीपणे मांडणाऱ्या युवा चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि अनिश गवांडे यांच्यासह एकूण दहा नेत्यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे :
१. जितेंद्र आव्हाड
२. क्लाईड क्रास्टो
३. भीमराव हत्तीअंबीरे
४. अनिश गवांडे
५. ॲड. फैजल मिर्झा
६. महेबूब इब्राहीम शेख
७. प्रवीण कुंटे पाटील
८. प्रशांत सोनबा वीरकर
९. ॲड. हेमाताई पिंपळे
१०. डॉ. चंद्रकांत बारेला
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी पक्षाने आपल्या प्रवक्त्यांच्या जुन्या पॅनेलमधील सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. त्यानंतर माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्याकडे अंतरिम काळासाठी पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
आता पुन्हा दहा प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली माध्यम आणि राजकीय संवाद यंत्रणा मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय वातावरण, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमधील संघर्ष आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नव्या प्रवक्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

