(मुंबई)
“कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. परंपरेचा, श्रद्धेचा आणि स्थापत्य मूल्यांचा सन्मान राखत हे काम पार पाडलं जाईल,” असे स्पष्ट मत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेलार होते. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजारा, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे, तसेच मंदिराचे महंत, पुजारी, आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी श्रीलक्ष्मी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
श्रद्धा आणि विज्ञानाचा समन्वय साधत जीर्णोद्धार
मंत्री शेलार म्हणाले, “तुळजाभवानी मंदिर हे धार्मिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्व दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासह, कोणतीही धार्मिक भावना दुखावली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. मंदिराच्या कळस आणि गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी एएसआय, आयआयटी आणि अन्य तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत संपूर्ण अहवाल 30 दिवसांत तयार करावा,” अशा सूचना त्यांनी दिल्या.
मंदिर परिसरातील इतर कामांवर कोणतीही अडथळा नाही
शेलार यांनी स्पष्ट केले की, “मंदिर परिसरातील इतर कामे थांबवण्याची आवश्यकता नाही. परंपरा, श्रद्धा आणि विज्ञान यांचा समन्वय साधत जीर्णोद्धाराची दिशा ठरवली जाईल. संवाद आणि समन्वयातूनच निर्णय घेतले जातील.” या संदर्भातील अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

