(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, या यादीत महिला उमेदवारांनी स्पष्ट आघाडी घेतली आहे. पवित्र प्रणालीद्वारे राबविण्यात आलेल्या मुलाखतीशिवाय शिक्षक भरती प्रक्रियेत एकूण 13 हजार 119 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 7 हजार 934 महिला आणि 5 हजार 185 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा 2 हजार 749 ने अधिक आहे.
मुलाखतीशिवाय प्रकारातील गुणवत्ता यादी गुरुवारी, 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध करण्यात आली. पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती केली जात आहे. मुलाखतीची आवश्यकता नसलेल्या पदांसाठी उमेदवारांची गुणवत्ता, प्राधान्यक्रम आणि उपलब्ध रिक्त पदांच्या आधारे शिफारस करण्यात आली आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत शिक्षक भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते.
आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारांसाठी पवित्र पोर्टलवर 1 मे ते 20 ऑगस्टदरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून 6 ते 16 ऑगस्टदरम्यान प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील एकूण 19 हजार 754 रिक्त पदांपैकी 13 हजार 119 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 10 दिवसांत रुजू व्हावे लागणार
गुणवत्ता यादीत शिफारस झालेल्या उमेदवारांना पुढील 10 दिवसांच्या कालावधीत संबंधित शाळा किंवा संस्थेत रुजू करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, त्यापूर्वी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांसाठी आता कागदपत्र पडताळणी आणि रुजू होण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
हजारो पदे अद्याप रिक्त
दरम्यान, समांतर आरक्षणाच्या काही प्रवर्गांमध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त राहिली आहेत. माजी सैनिकांसाठी 15 टक्के आणि अंशकालीन उमेदवारांसाठी 10 टक्के समांतर आरक्षणानुसार जाहिरातीत पदे मंजूर करण्यात आली होती. मात्र, या प्रवर्गांमध्ये आवश्यक संख्येने उमेदवार उपलब्ध न झाल्याने अनुक्रमे 2 हजार 760 आणि 1 हजार 760 पदे रिक्त राहिली आहेत.
याशिवाय अनुसूचित जमाती प्रवर्गातील 802 पदे आणि पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची 1 हजार 408 पदेही रिक्त राहिली आहेत. या सर्व रिक्त पदांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, पुढील टप्प्यात प्रवर्गनिहाय या पदांवर भरती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
शिक्षक भरतीच्या या गुणवत्ता यादीमुळे हजारो उमेदवारांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला असून, शिफारस झालेल्या 13 हजार 119 उमेदवारांच्या नियुक्तीची पुढील प्रक्रिया आता सुरू होणार आहे.

