(मुंबई / वृत्तसंस्था)
नेपाळमध्ये आलेल्या भीषण जलप्रलय आणि भूस्खलनामुळे मुंबईतील दोन नामांकित डॉक्टर दाम्पत्य (एकूण ४ डॉक्टर) कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान बेपत्ता झाले आहेत. २६ ऑगस्ट २०२६ रोजी तिबेट-नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालयाजवळ झालेल्या ढगफुटीनंतर या सर्व डॉक्टरांशी असलेला संपर्क अचानक तुटला आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि अनुभवी गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे आणि त्यांच्या पत्नी जान्हवी चितळे यांच्याशी संपर्क तुटला आहे. दोघेही 61 जणांच्या यात्रेच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेले होते. नेपाळ-तिबेट सीमेवरील पूरस्थिती आणि संपर्क यंत्रणा विस्कळीत झाल्याने या समूहाबाबत चिंता वाढली आहे. डॉ. चितळे यांच्या अंधेरी पूर्वेतील क्लिनिकबाहेर लावलेली सुट्टीची चिठ्ठी आता त्यांच्या रुग्णांच्या आणि स्थानिकांच्या चिंतेचे कारण ठरली आहे.
डॉ. मिलिंद चितळे यांनी 23 ऑगस्ट रोजी 61 जणांच्या समूहासह कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात केली होती. यात्रेच्या कालावधीत त्यांचा दवाखाना बंद राहणार असल्याची सूचना त्यांनी आधीच क्लिनिकच्या दरवाजावर लावली होती. 24 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत क्लिनिक बंद राहील, अशी ही चिठ्ठी होती. मात्र, नेपाळमध्ये भीषण पूर आल्याची माहिती समोर आल्यानंतर डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीसह यात्रेतील काही जण संपर्काबाहेर असल्याचे कळताच रुग्ण आणि शेजाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
30 वर्षांचा गिर्यारोहणाचा अनुभव
डॉ. मिलिंद चितळे हे वैद्यकीय क्षेत्रासोबतच गिर्यारोहण आणि साहसी मोहिमांसाठीही ओळखले जातात. गेल्या तीन दशकांपासून ते हिमालयातील विविध मोहिमा आणि ट्रेकिंगमध्ये सक्रिय आहेत. 2005 मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा ‘गिरिमित्र पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते. त्यांनी ‘Hills and Trails’ या साहसी उपक्रमाची स्थापना केली होती.
डॉ. चितळे यांनी हिमालयातील 3,000 हून अधिक ट्रेल्स आणि मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. 8,000 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या शिखरावरील पहिल्या भारतीय नागरी मोहिमेत त्यांनी ‘क्लाइंबिंग डॉक्टर’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. कांचनगंगा पर्वतावर 23 हजार फुटांपेक्षा अधिक उंची गाठण्याचा अनुभवही त्यांच्या नावावर आहे. गिर्यारोहणासोबतच त्यांनी मुंबई ते गोवा आणि मुंबई ते कन्याकुमारी असा लांब पल्ल्याचा सायकल प्रवासही पूर्ण केला आहे.
डॉ. चितळे यांच्या बेपत्ता होण्याची माहिती समोर आल्यानंतर अंधेरीतील त्यांच्या क्लिनिक परिसरातील रुग्ण आणि शेजारीही चिंतेत आहेत. स्थानिकांच्या आठवणींनुसार, डॉ. चितळे हे मनमिळाऊ आणि मदतीला तत्पर स्वभावाचे होते. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी स्थानिकांकडून प्रार्थना केली जात आहे.
61 जणांच्या समूहाशी संपर्क तुटला
डॉ. चितळे हे या 61 जणांच्या कैलास मानसरोवर यात्रेच्या समूहाचे नेतृत्व करत होते. नेपाळ-तिबेट सीमेवरील अचानक आलेल्या पुरामुळे परिसरातील दळणवळण आणि संपर्क व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. त्यामुळे समूहातील सदस्यांशी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचे वृत्त आहे. कुटुंबीय आणि संबंधित यंत्रणा त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे यांच्याशीही संपर्क तुटला
अंधेरीतील डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे यांच्याशीही संपर्क तुटला आहे. डॉ. आनंद देशपांडे हे हिंदुजा रुग्णालयातील रक्त संक्रमण शास्त्र विभागाचे प्रमुख आणि सल्लागार आहेत. तर डॉ. गायत्री देशपांडे या नानावटी रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख तसेच वरिष्ठ सल्लागार आहेत. हे दाम्पत्य मुंबईतील ‘हिल्स अँड ट्रेल्स’ या टूर कंपनीमार्फत नेपाळला गेले होते.
बुधवारी सकाळी 8.28 वाजता शेवटचा संपर्क
डॉ. देशपांडे यांच्या भाची मैथिली मुंडले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांचे त्यांच्याशी बुधवारी सकाळी 8.28 वाजता शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी अनेकदा फोन आणि संदेशाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. व्हॉट्सॲपवर संदेश पाठवल्यानंतर केवळ एकच ‘टिक’ दिसत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रातील इतर भाविकांना दिलासा
दरम्यान, नेपाळ आणि तिबेटमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील काही भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील 37 भाविकांना सुरक्षितपणे काठमांडूकडे रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
106 जण आज नागपूरच्या दिशेने रवाना होणार
नेपाळमध्ये अडकलेले नागपूरचे 106 नागरिक अनेक अडथळे पार करत सध्या बिहारमधील सीतामढी येथे पोहोचले आहेत. या नागरिकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था बिहारच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय या सर्वांच्या सातत्याने संपर्कात असून, त्यांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती मदत केली जात आहे. हे सर्व 106 नागरिक आज पाटणा येथून रेल्वेने नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यालयाकडूनही आवश्यक मदत केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी दिली.
नेपाळमधील प्रतिकूल परिस्थितीत अडकलेल्या या नागरिकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून समन्वय साधला जात असून, आज त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, नेपाळमधील महापुरामुळे अनेक भारतीय पर्यटक आणि भाविक संपर्काबाहेर गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाकडून अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्याचे तसेच त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

