(मुंबई)
‘शोले’ चित्रपटातील अजरामर जेलरच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ हास्य अभिनेता असरानी यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. असरानी यांना फुफ्फुसांचा त्रास होता. त्यांच्या छातीत पाणी झाले होते. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील जुहू येथील आरोग्यनिधी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी दिली.
दरम्यान ज्येष्ठ अभिनेते असरानी यांची शेवटची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. असरानी यांच्या निधनाची बातमी येण्याच्या काही तास आधी, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आणि काही तासांनंतर, त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
चार दिवसांपासून उपचार सुरू होते
असरानी यांना मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ जाणवत होती. रक्तस्त्रावाचा त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईच्या सांताक्रूझ भागातील शास्त्रीनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह जवळचे लोक उपस्थित होते.
जयपूरमध्ये झाला जन्म, शिक्षणानंतर चित्रपटसृष्टीकडे वळले
गोवर्धन असरानी यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी जयपूर येथे झाला. त्यांनी सेंट झेविअर स्कूल आणि राजस्थान कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर 1960 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ‘गुड्डी’ या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
एफटीआयआयमधून बाहेर पडून संघर्ष, नंतर शिक्षण आणि त्यानंतर सातत्याने ऑडिशन देणे अशा गोष्टींनी त्यांच्या प्रवासाला आकार दिला. कदाचित म्हणूनच भूमिका लहान असो वा मोठी, त्यांनी त्या नेहमी पूर्ण आदराने आणि तयारीने साकारल्या. असरानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “माझ्या दृष्टीने कॉमेडी म्हणजे फक्त हसवणं नव्हे, तर सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. हसण्याच्या माध्यमातून माणूस आपल्या भीतीतून, दांभिकतेतून आणि रूढ चौकटीतून बाहेर पडतो.”
चारशेहून अधिक चित्रपटांत बहुरंगी भूमिका
असरानी यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘खट्टा मिठा’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारल्या. “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं” हा त्यांचा प्रसिद्ध डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात कोरला आहे. या पात्राच्या बॉडी लँग्वेजमध्ये हिटलरची झलकही दडलेली होती. शोले सिनेमातील असरानी यांची भूमिका छोटी असली, तरी त्यांचे काही संवाद असंख्या सिनेरसिकांच्या आजही तोंडपाठ आहेत. विनोदी भूमिकांसोबतच त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले — ‘चला मुरारी हिरो बनने’, ‘सलाम मेमसाब’, ‘हम नहीं सुधरेंगे’, ‘दिल ही तो है’ हे त्यातील काही प्रमुख चित्रपट आहेत.
राजकारणातही आजमावले नशीब
चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीनंतर असरानी यांनी काही काळ राजकारणातही प्रवेश केला. त्यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले होते; मात्र त्या क्षेत्रात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. चार दशकांहून अधिक काळ बॉलिवूडला हास्य आणि आनंदाची भेट देणारे असरानी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

