(शिर्डी / वृत्तसंस्था)
देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तांकडून नेहमीच श्रद्धेने मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. सोन्या-चांदीच्या वस्तू, हिरेजडीत दागिने तसेच विविध कलात्मक वस्तू अर्पण करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांत वाढली आहे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने दोन साईभक्तांनी साईचरणी हिरेजडीत सोन्याचे ब्रोच अर्पण केले असून, या दोन्ही ब्रोचची एकूण किंमत तब्बल 15 लाख 69 हजार रुपये आहे.
गुजरातमधील वडोदरा येथील साईभक्त तीर्थकुमार पटेल यांनी साईबाबांच्या चरणी 31 ग्रॅम वजनाचा हिरेजडीत सोन्याचा ब्रोच अर्पण केला. या ब्रोचची अंदाजे किंमत 4 लाख 50 हजार रुपये असून, त्यावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. श्रद्धेने हा मौल्यवान ब्रोच साईबाबांना अर्पण करत पटेल यांनी आपली बाबांवरील श्रद्धा व्यक्त केली.
दरम्यान, दिल्लीचे रहिवासी आणि सध्या इटलीमध्ये वास्तव्यास असलेले साईभक्त सतीश कुमार चान्ना यांनीही साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सोन्याचा ब्रोच अर्पण केला. 75 ग्रॅम वजनाच्या या ब्रोचची किंमत तब्बल 11 लाख 19 हजार रुपये असून, त्यावर नयनरम्य नक्षीकाम करण्यात आले आहे.
दोन्ही भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या या मौल्यवान ब्रोचची साईबाबा संस्थानच्या वतीने नोंद घेण्यात आली. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार भक्तांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला. संस्थानच्या वतीने दोन्ही देणगीदारांचे आभार व्यक्त करण्यात आले.
“बाबांच्या कृपेने संसार सुखी”
साईभक्त तीर्थकुमार पटेल यांनी साईबाबांवरील श्रद्धेसोबतच शिर्डीशी असलेले आपले भावनिक नातेही व्यक्त केले. “1998 मध्ये पहिल्यांदा शिर्डीत आलो. त्यानंतर बाबांच्या बोलावण्याने दरवर्षी नियमितपणे दर्शनासाठी शिर्डीत येत आहे. कधी-कधी वर्षातून दोन वेळाही शिर्डीला येण्याचा योग येतो,” असे त्यांनी सांगितले.
“बाबांवर आमची अपार श्रद्धा आहे. त्यांच्याच कृपेने आमचा संसार सुखी आणि स्थिर आहे. दोन्ही मुले चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत असून, नोकरीही चांगल्या ठिकाणी करत आहेत. आयुष्यात आता कसलीही उणीव उरलेली नाही,” अशा शब्दांत तीर्थकुमार पटेल यांनी साईबाबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
1998 मध्ये पहिल्यांदा शिर्डीत आलो, त्यावेळची शिर्डी आणि आजची शिर्डी यामध्ये मोठा बदल झाला आहे. साई मंदिराचा परिसर, दर्शन व्यवस्था आणि भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचेही पटेल यांनी नमूद केले.
देश-विदेशातून शिर्डीत येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी साईबाबा संस्थानकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाविकांकडून साईचरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीचा मंदिर विकास, भाविकांच्या सुविधा आणि समाजकल्याणासाठी योग्य पद्धतीने वापर होत असल्याचे पाहून समाधान वाटते, असे सांगत त्यांनी संस्थानच्या कारभाराचे कौतुक केले.

