( कोल्हापूर / वृत्तसंस्था )
कोल्हापुरात आंतरराज्यीय संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरातून कुख्यात बिश्नोई टोळीचा म्होरक्या शामलाल गोवर्धनराम पुनिया ऊर्फ बिश्नोई आणि त्याचा साथीदार श्रीराम मंजू ऊर्फ पाचाराम बिश्नोई यांना ताब्यात घेतले आहे. दोघेही गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. दोघे कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालय परिसरात सापळा रचला.
दोन्ही आरोपी कारमधून पार्किंगच्या जागेतून बाहेर पडत असताना पोलिसांचे पथक त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. पोलिसांना पाहताच आरोपींनी कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ गेट बंद करून त्यांचा मार्ग अडवला आणि दोघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईमुळे कोल्हापुरात बिश्नोई टोळीविरोधातील पोलिसांच्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शामलाल पुनिया याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत. तर श्रीराम मंजू याच्यावर हत्येचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंग, लुटालूट आणि घरफोडी यांसह एकूण 26 गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगचे सदस्य आणि टोळीचा म्होरक्या कोल्हापुरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना पिंपरी-चिंचवड आणि राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणानंतर बिश्नोई गँगचे नाव पुन्हा चर्चेत आले होते. या प्रकरणात कोल्हापूरशी संबंधित अमोल गायकवाड याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. आता बिश्नोई टोळीचा म्होरक्या शामलाल पुनिया आणि त्याचा साथीदार श्रीराम मंजू कोल्हापुरात आढळून आल्याने पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
हे दोघे नेमके कोल्हापुरात कोणत्या कारणासाठी आले होते? न्यायालय परिसरात त्यांची उपस्थिती का होती? तसेच त्यांच्या कोल्हापूर भेटीमागे आणखी कोणता गुन्हेगारी कट होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यांच्या चौकशीतून बिश्नोई टोळीच्या कोल्हापूर कनेक्शनबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

