[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
गुन्हेगारीचा तपास केवळ पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अभिनव संकल्पनांची प्रभावी सांगड घालत पोलिसिंगला नवी दिशा देणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कार्याची आता राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून साकारलेल्या RAIDS ॲपची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेसाठी निवड झाली असून, या स्पर्धेत देशातील प्रथम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बगाटे यांचा समावेश झाला आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सादरीकरण सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA), हैदराबाद येथे करण्यात आले.
अज्ञात व बेवारस मृतदेहांची ओळख पटविणे हे पोलिसांसमोरील अत्यंत संवेदनशील आणि तितकेच आव्हानात्मक काम. मृतदेहाची अवस्था बिघडलेली असल्यास चेहरा ओळखणे तर अधिकच कठीण होते. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन या मृतदेहांना पुन्हा एक ओळख देण्याची कल्पना बगाटे यांनी प्रत्यक्षात आणली. RAIDS ॲप हा त्याच तंत्रज्ञानाधिष्ठित विचारांचा परिणाम आहे. या ॲपच्या माध्यमातून अज्ञात व बेवारस मृतदेहांची माहिती एकाच ठिकाणी संकलित केली जाते. उपलब्ध छायाचित्रे व अन्य माहितीच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून मृतदेहाच्या चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. मृतदेहाची अवस्था खराब असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नसतानाही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा पुनर्निर्मित करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याच्या तपासाला तांत्रिक आधार मिळतो. विशेष म्हणजे बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. एका व्यक्तीच्या चेहऱ्याच्या तब्बल १०८ विविध रूपांची निर्मिती करून त्याआधारे तांत्रिक पद्धतीने शोध घेण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक तपासपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.
RAIDS ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत १५३ बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ बेवारस व कुजलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या. त्यातील १४ प्रकरणांमध्ये मृतदेहांची यशस्वी ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्याच्या सीमा ओलांडूनही या उपक्रमाची उपयुक्तता अधोरेखित झाली आहे. जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस मृतदेहांपैकी सात मृतदेहांची ओळख RAIDS च्या सहाय्याने पटविण्यात आली आहे. याशिवाय ॲपवर ३८१ बेपत्ता व्यक्तींची नोंद करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ११ बेपत्ता व्यक्तींच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा शोध घेण्यात यश आले आहे.
पोलिसिंग म्हणजे केवळ गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेणे नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासाची नवी दारे उघडणे, हरवलेल्या व्यक्तीला कुटुंबापर्यंत पोहोचविणे आणि अनोळखी मृतदेहाला त्याची ओळख मिळवून देणे, या व्यापक दृष्टिकोनातून बगाटे यांच्या नेतृत्वाखालील रत्नागिरी पोलिसांची वाटचाल अधोरेखित होत आहे. ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’मधील प्रथम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झालेली निवड ही या वाटचालीवर उमटलेली राष्ट्रीय स्तरावरील मोहोर असून, रत्नागिरीच्या पोलिसिंगमध्ये तंत्रज्ञान आणि संवेदनशीलतेचा संगम साधणाऱ्या नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाची ही ठळक दखल ठरली आहे.
तंत्रज्ञानातून तपासाला नवी दिशा
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दिशेने बगाटे यांच्या नेतृत्वाखाली विविध अभिनव उपक्रम राबविण्यात आले आहेत. पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा उपयोग करून तपास अधिक गतिमान, अचूक आणि परिणामकारक करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून त्यामागे एखाद्या कुटुंबाची प्रतीक्षा, वेदना आणि आपल्या व्यक्तीच्या परतीची आशा दडलेली असते. त्यामुळे ‘ओळख नसलेला मृतदेह’ हा केवळ पोलिसांच्या नोंदीतील आकडा न राहता त्याला पुन्हा नाव आणि कुटुंबाशी जोडण्याचा प्रयत्न RAIDSच्या माध्यमातून होत आहे. या दृष्टिकोनामुळे या उपक्रमाला मानवी संवेदनशीलतेचीही जोड मिळाली आहे.
‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’मध्ये राष्ट्रीय दखल
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलिस तपासात प्रत्यक्ष परिणाम साधणाऱ्या या उपक्रमाची दखल ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेने घेतली आहे. देशातील प्रथम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नितीन बगाटे यांची झालेली निवड ही त्यांच्या वैयक्तिक कामगिरीइतकीच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नाविन्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावरील पोचपावती मानली जात आहे. विशेष म्हणजे, अज्ञात मृतदेहांची ओळख, बेपत्ता व्यक्तींचा शोध आणि AIचा पोलिसिंगमध्ये प्रत्यक्ष वापर या तीनही बाबींना एकत्र आणणारी RAIDSची संकल्पना आता रत्नागिरीच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचली आहे.

