(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे पेट्रोलिंगदरम्यान अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारी पिकअप गाडी साखरपा पोलिसांनी पकडली. या कारवाईत गुरांसह संबंधित वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपती सावंत (वय ३९, रा. येळाणे, ता. शाहूवाडी) हे आपल्या ताब्यातील एमएच ०७ पी ३६१६ क्रमांकाच्या पिकअप गाडीतून २५ हजार रुपये किमतीच्या गुरांची वाहतूक करत होते. मुंडे तर्फे सावर्डे येथून येळाणे, तालुका शाहूवाडी येथे गुरे घेऊन जात असताना त्यांची गाडी कोंडगाव तिठा येथे आली.
यावेळी पेट्रोलिंग करत असलेल्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील यांच्या निदर्शनास ही गाडी आली. त्यानंतर मनस्वी पावसकर यांनी गुरांसह पिकअप गाडी ताब्यात घेऊन ती साखरपा पोलीस दूरक्षेत्रात आणली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव अधिक तपास करत आहेत.


