(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली बौद्धवाडीचे सुपुत्र राहुल मंगेश गमरे यांनी अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमबीबीएस (MBBS) शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गोळवली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून, त्यांच्या यशाबद्दल गोळवली बौद्धवाडी तसेच मुंबई मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
राहुल गमरे यांनी फिलिपाईन्स येथे चार वर्षांचे एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षणाची वाटचाल सातत्याने सुरू ठेवली आणि अखेर डॉक्टर ही पदवी संपादन केली. त्यांच्या या यशामागे आई-वडील मंगेश गमरे आणि वैशाली गमरे यांचे मोलाचे मार्गदर्शन, त्याग आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले.
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राहुल यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर गोळवलीसह तालुक्यात अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या यशाची बातमी समजताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राहुल यांच्या यशामुळे गोळवली सारख्या गावातील तरुणांसमोर शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे नवे उदाहरण निर्माण झाले आहे. प्रतिकूल परिस्थिती असली तरी जिद्द, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर आपले ध्येय गाठता येते, हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
डॉ. राहुल मंगेश गमरे यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी ग्रामस्थ, मुंबई मंडळ तसेच कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि वैद्यकीय कौशल्याचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी करून संवेदनशील व यशस्वी डॉक्टर म्हणून लौकिक मिळवावा, अशी सदिच्छा व्यक्त होत आहे.

