(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात सायबर गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, महिनाभराच्या कालावधीत तिसरी मोठी ऑनलाईन फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. संगमेश्वर शहरातील दोन ताज्या घटनांचा तपास सुरू असतानाच आता ग्रामीण भागातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या माखजन बाजारपेठेलाही सायबर चोरांनी लक्ष्य केले आहे. माखजन येथील एका फुटवेअर व्यावसायिकाच्या विविध बँक खात्यांमधून अज्ञात भामट्यांनी तब्बल ३८ हजार रुपये परस्पर ऑनलाईन ट्रान्सफर करून लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संगमेश्वरनंतर माखजनवर डल्ला
गेल्या काही दिवसांत संगमेश्वर शहरात सायबर फसवणुकीच्या दोन गंभीर घटना घडल्या होत्या. त्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता माखजन बाजारपेठेत तिसरा डल्ला पडल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. एकाच तालुक्यात अल्पावधीत तीन मोठ्या सायबर फसवणुकीच्या घटना घडल्याने एखादे संघटित सायबर रॅकेट सक्रिय आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुकानात व्यवसाय सुरू असतानाच खात्यांवर हात साफ
माखजन येथील रोहिदासवाडीचे रहिवासी संतोष यशवंत सावर्डेकर यांचे माखजन बाजारपेठेत फुटवेअरचे दुकान आहे. २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान ते दुकानात व्यवसायात व्यस्त असताना अज्ञात सायबर चोरांनी त्यांच्या बँक खात्यांमध्ये घुसखोरी केली.
भामट्यांनी सावर्डेकर व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या संयुक्त खात्यातून २ हजार रुपये, जनता सहकारी बँकेच्या खात्यातून १२ हजार रुपये आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या दुसऱ्या वैयक्तिक खात्यातून २४ हजार रुपये असे एकूण ३८ हजार रुपये विविध खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने वर्ग करून घेतले.
फसवणुकीची माहिती मिळताच सावर्डेकर यांनी तातडीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
सायबर टोळीच्या शोधाकडे सर्वांचे लक्ष
सायबर गुन्हेगार कोणत्याही भौगोलिक मर्यादेत अडकत नसल्याने अशा गुन्ह्यांचा तपास करणे मोठे आव्हान ठरत आहे. संगमेश्वर शहर व माखजन येथील तिन्ही घटनांमधील साम्य शोधून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या टोळीचा माग काढणे अत्यावश्यक बनले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे. तालुक्यात खळबळ उडविणाऱ्या या सायबर टोळीचा पर्दाफाश कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

