(पालघर)
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील कै. दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत बुधवारी मध्यरात्री दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत मुलांची नावे देविदास परशुराम नवले (वय १५) आणि मनोज सीताराम वड (१४) आहेत. दोघेही मोखाडा तालुक्यातील रहिवासी होते. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, मात्र या धक्कादायक घटनेने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ४५० विद्यार्थी शिकतात. देविदास दहावीत आणि मनोज नववीत शिकत होते. मंगळवारच्या रात्री सर्व विद्यार्थी जेवणानंतर झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हे दोन्ही विद्यार्थी पाण्याच्या टाकीजवळ गेले. तिथे कपडे सुकवण्यासाठी असलेल्या दोरीच्या सहाय्याने त्यांनी झाडाला गळफास घेतला. रात्री अंदाजे दीडच्या सुमारास सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नजरेस ही घटना आली. मध्यरात्री सुरक्षा रक्षकाला शाळेच्या मागील आवारात काहीतरी झाडाला लटकताना दिसले. जवळ जाऊन पाहिल्यावर त्याला दोघे जण गळफास घेतलेले दिसले. सुरक्षा रक्षकाने त्वरित मुख्याध्यापक, अधीक्षक आणि इतर शिक्षकांना माहिती दिली. नंतर गावातील पोलिस पाटील व सरपंच यांना कळवून पोलिसांना घटनास्थळी बोलावले गेले. दोन्ही विद्यार्थ्यांना झाडावरून उतरवून वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच जव्हार आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, पालघरचे अप्पर पोलिस अधीक्षक विनायक नरले, आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि भाजपचे नेते प्रकाश निकम यांनी घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. पालकांनी शाळा प्रशासनाच्या उदासीनतेचा आणि देखरेखीतील त्रुटींचा जाब विचारला आहे. शासनाने या घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण तयार करण्याची मागणी आता जिल्हाभरातून होत आहे.
भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ या संस्थेच्या आश्रमशाळेने आत्महत्येची गंभीर दखल घेतली असून, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते आणि अधीक्षक राजू सावकारे यांना निलंबित केले असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त भरत सावंत यांनी दिली.

