[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेळवंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळवंड नं. ३, भायजेवाडी येथे ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला.
देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी आणि त्यांच्याप्रती आदर, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी तसेच पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सैनिकांसाठी आकर्षक आणि प्रेमपूर्वक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांच्या छोट्याशा हातांनी तयार केलेल्या या राख्यांमधून जवानांप्रती असलेला स्नेह, आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त झाली. ‘सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांच्या मनगटावर प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची राखी बांधणे, हीच आमची देशभक्ती!’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांकडूनही उत्स्फूर्त दाद मिळाली. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय क्षिरसागर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राधिका शितप तसेच अंगणवाडी सेविका प्रियांका भायजे यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेळवंड गावचे पोस्टमास्तर रोहित यादव आणि त्यांचे सहकारी लिंगायत यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रेमाची ही राखी देशसेवेत कार्यरत असलेल्या जवानांपर्यंत पाठविण्याचा मार्ग सुकर झाला. देशरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देशसेवेचा आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा धडा मिळाला. शाळेच्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि परिसरातून कौतुक होत आहे.

