(रत्नागिरी)
येथील ऐतिहासिक आणि समृद्ध परंपरा लाभलेल्या वेद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित निवासी वासंतिक संस्कार वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी, दापोली, गुहागरसह मुंबई, पुण्यातील विद्यार्थ्यांनीही येथे १५ दिवस संध्या, सूर्यनमस्कार, विविध स्तोत्रांचे धडे गिरवले.
या १५ दिवसांच्या निवासी वासंतिक वर्गाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठणाने करण्यात आली. तर सांगता कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विजय दांडेकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हिंदु धर्म शिक्षणाची आवश्यकता, धर्माचे संस्कृतीकरण आणि धर्माच्या गोष्टीवर टिकून कसे जगले पाहिजे, हा वासंतिक वर्गाचा उद्देश असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी दररोज सूर्यनमस्कार व संध्या, स्तोत्रे यांची उपासना करावी व अभ्यास करावा असे आवाहन दांडेकर यांनी केले.या वर्गात ८ ते १४ वयोगटातील सहभागी विद्यार्थी झाले. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला व काही विद्यार्थ्यांना प्रवेश देता आला नाही.
सकाळी संध्या, सूर्यनमस्कार, पुरुषसुक्त, विष्णुसहस्त्रनाम, महिन्मस्तोत्र, गीतेचा पंधरावा अध्याय आदी शिकवण्यात आले. अध्यापनाचे कार्य वेदमूर्ती केतन शहाणे गुरुजी यांनी पाहिले. दररोज संध्याकाळी प्रवीण जोशी यांनी माधवराव मुळ्ये भवन येथे रा. स्व. संघाच्या शाखेमध्ये विविध खेळ व उपक्रम करून घेतले. त्यांनी शाखेची शिस्त जोपासण्याचे आवाहन केले.
वर्गासाठी वेदमूर्ती संदीप भावे, ओंकार पाध्ये, महेश करंबेळकर, संदीप आठल्ये, गणेश लेले यांनी विशेष मेहनत घेतली. सध्या वेदशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी वे. मू. केतन शहाणे (7400293299) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वेद शाळेतर्फे करण्यात आले.

