(रत्नागिरी)
शहरातील उद्यमनगर परिसरात रविवारी (दि. 17 ऑगस्ट) दुपारी झालेल्या अपघातात विजेचा धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव मिथून चंदू खेत्री (वय 34, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे असून, तो भंगाराच्या व्यवसायात कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मिथून हा आपल्या राहत्या घराजवळ इलेक्ट्रिक पंप पाण्यात टाकत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

