(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याविरोधात सोशल मीडियावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पासपोर्ट पडताळणीसाठी येणाऱ्या तरुणांशी जवळीक साधून त्यांना चुकीच्या संगतीत ढकलण्यात आल्याचा, तसेच काही आक्षेपार्ह कृत्यांशी संबंधित पुरावे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी व्हिडिओद्वारे केला आहे.
या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीने २० ते २५ वयोगटातील तरुणांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्यांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या माध्यमातून काही तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जाळ्यात अडकले असावेत, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आक्षेपार्ह स्वरूपाचे व्हिडिओ असल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये काही तरुणींच्या कथित आक्षेपार्ह चित्रफितींचा उल्लेख करण्यात आला असून, त्यामागे ब्लॅकमेलिंगचे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र या दाव्यांना अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेची पुष्टी मिळालेली नाही. सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबर यांनी यापूर्वीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचा दावा केला असून, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित पुरावे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक तसेच राज्य शासनाने स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आरोपांची सत्यता तपासण्यासाठी अधिकृत चौकशीची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधूनही आता व्यक्त होत आहे.

