(रत्नागिरी)
बाळ जन्माला येण्यापूर्वी म्हणजेच गर्भारपणात मातेच्या नियमित चाचण्या कराव्या लागतात. यात अगदी हिमोग्लोबिन, थायरॉईड, ओजीटीटी, मुत्रातील प्रथिने व साखरेचे प्रमाण, एच आय व्ही, कावीळ ब, सिफिलिस इत्यादी महत्वाच्या चाचण्यांचा समावेश असतो. या दरम्यान किमान पाच वेळा तरी मातेची तपासणी व्हावी लागते. या तपासण्यांद्वारे, आई आणि बाळाच्या आरोग्याची तपासणी करून, संभाव्य समस्या ओळखल्या जातात आणि योग्य उपाययोजना करता येतात.
बाळ होऊ देण्याचे वय
आईचे ३५च्या आत: प्रसुती सुलभ होण्याच्या दृष्टीने आईचे वय ३५ वर्षाच्या आत असावे लागते. २५ ते ३० हे प्रसुतीसाठी योग्य वय मानले जाते. वडिलांचे ४५च्या आत: सुदृढ किंवा निरोगी बालक जन्माला येण्यासाठी पित्याचेही वय ४५ च्या आत असणे गरजेचे असते.
बाळाला गंभीर आजार तर नाही ना?
अल्ट्रासाऊंड : अल्ट्रासाऊंडद्वारे बाळाच्या अवयवांची (organs) आणि शरीराच्या भागांची तपासणी करता येते.
रक्त चाचणी: आईच्या रक्ताची तपासणी करून, जन्मजात आजारांची शक्यता कळू शकते.
अँम्निओसेन्टेसिस : या चाचणीत, गर्भाशयातील द्रव घेऊन, बाळाच्या गुणसूत्रांची तपासणी केली जाते. या चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्या जातात.
३५-४५ नंतर बाळ होत असेल तर कोणती जोखीम असते
अधिक वयात (३५ किंवा ४५ वर्षांपेक्षा जास्त) होणाऱ्या प्रसूतीमध्ये गर्भपात, गर्भधारणेतील मधुमेह, गर्भाच्या गुणसूत्रातील विकृती, आणि मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढू शकतो. तसेच सिझेरियन प्रसुतीची शक्यता देखील वाढू शकते.
अधिक वयात होणारी प्रसुती ही जोखमीची असते. त्यामुळे अशा परिस्थितीत नियमित तपासणी करावी लागते. वाढत्या वयानुसार हाडांना सांधणारे लिगामेंटसची लवचिकता कमी होते. त्यामुळे प्रसुतीत अडचण येऊ शकते. मुदतपूर्व किंवा सिझेरियन प्रसुतीचीही शक्यता वाढते.
-डॉ. विनोद सांगवीकर, (स्त्री रोग विशेष तज्ज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी)

