(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी (३० जून) दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली असून, १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत होण्याची अपेक्षा आहे. विविध विभागांच्या विकासकामांच्या आराखड्यांना मंजुरी देत निधी वितरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याने जिल्हा परिषद सदस्यांसह प्रशासनाचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असून, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती विलास चाळके, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, कृषी सभापती महेंद्र नाटेकर यांच्यासह सर्व सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा झाली होती. मात्र, निधी वाटपासह महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय घेता आले नव्हते. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही विशेष सभा बोलाविण्यात आली असून, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, पाणीपुरवठा तसेच अन्य विकास विभागांतील प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद सदस्यांची निवड झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५७ प्रभागांतील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विकासकामांना चालना देणारे निर्णय, निधीचे नियोजन आणि विविध विभागांच्या कामांचा पुढील आराखडा निश्चित होणार असल्याने या विशेष सभेकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे.

