(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील सोमेश्वर (मयेकरवाडी) येथील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांनी मयेकरवाडी येथे प्रत्यक्ष भेट देत रस्त्याची पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित कामाबाबत आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन करून ग्रामस्थांबाबत चर्चा करण्यात आली.
रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती, पुढील टप्प्यात करावयाच्या उपाययोजनांबाबत उपअभियंत्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी वाडीतील ग्रामस्थ देखील उपस्थित होते. ग्रामस्थांनी काही काळापासून रखडलेले काम तातडीने सुरू करावे, अशी विनंती अधिकाऱ्यांकडे केली. उपअभियंत्यांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे प्रशासनाने या कामाची गांभीर्याने दखल घेतल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली. सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना, काम नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वृत्ताच्या माध्यमातून उपस्थित झालेल्या प्रश्नांवर त्वरित कार्यवाही होत असल्याचे चित्र या पाहणीमुळे स्पष्ट झाले असून, मयेकरवाडीतील रस्त्याच्या कामाला आता गती मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

