(रत्नागिरी)
निवडणुकीच्या कालावधीत मद्याचा वाहणारा पूर रोखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने कडक पावले उचलली आहेत. पोलिसांनी गावठी दारूची हातभट्टी, जुगार अड्ड्यावर धाड टाकून उद्ध्वस्त करण्याचा सपाटा चालवला असून, गावठी दारूही जप्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ७ ठिकाणी कारवाई करून १३९ लिटरची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवळे बाजारपेठ येथे दिवाणवाडा येथील आपट्याच्या झाडाच्या आडोशाला दारू विक्रीसाठी स्वत:जवळ बाळगून असणाऱ्या संतोष बंडू साळवी (५१, रा. देवळे कुंभारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ९२० रुपयांची ९ लिटर दारू जप्त करण्यात आली. आरवली गड नदीपात्राच्या किनारी तुकाराम गणू लांबे (५३, रा. लांबेवाडी-आरवली) याच्यावर कारवाई करून २,१०० रुपयांची २० लिटर दारू जप्त करण्यात आली.
लांजा येथे कोट पाष्टेवाडी येथे घराच्या पाठीमागे कारवाई करून ८,४२० रुपयांची ८२ लिटर दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी संतोष शंकर पाष्टे (४६, रा. कोट-पाष्टेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दापोलीतील गावतळे भडवळे रस्त्यावरील गावतळे दत्तवाडी येथे कारवाई करून ९०० रुपयांची ९ लिटर दारू जप्त केली. याप्रकरणी नारायण राजाराम कलमकर (३६, रा. कोळबांद्रे- कुंभारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राजापूर तालुक्यातील नाटे पोलिस हद्दीतील गुरववाडी- धाऊलवल्ली येथे ९०० रुपयांची ९ लिटर दारू जप्त केली असून, शांताराम विठ्ठल गुरव (६८, रा. गुरववाडी- धाऊलवल्ली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील साठरे भराडीनवाडी तिसंगीचा पऱ्या येथील कारवाईत ५५० रुपयांची ५ लिटर दारू जप्त करून एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. जयगड पोलिस स्थानक हद्दीत मौजे जांभारी खारवीवाडा येथे ५४० रुपयांची ५ लिटर दारू जप्त करून एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.