(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील साठरेबांबर तळी परिसरातून चार गावठी बैलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कोल्हापूर येथील दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) दुपारी सुमारे २.१५ वाजता करण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आयशर टेम्पो आणि चार बैल असा एकूण ८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश दिलीप खोंगे (रा. ससेगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि अविनाश सुरेश गोसावी (वय २३, रा. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलिस शिपाई दर्शना शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संशयितांकडे गुरे वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसताना त्यांनी आयशर टेम्पो (एमएच-०९-जीजे-५५८५) मधून चार बैलांची वाहतूक केली. बैलांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी न करता, तसेच त्यांना पाणी व खाद्य न देता, दोरीने बांधून अमानुष पद्धतीने वाहतूक करण्यात येत होती.
या प्रकारामुळे प्राण्यांना वेदना होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहतूक थांबवली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

