( मंडणगड )
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी, श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ, मातोश्री हॉस्पिटल मंडणगड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल २०२६ रोजी आंबडवे (ता. मंडणगड) येथे आयोजित करण्यात आले असून, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शिबिर होणार आहे.
शिबिरातील तपासण्या व सुविधा
या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मोफत तपासण्या व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन, रक्तदाब तपासणी, मधुमेह (रक्तातील साखर) तपासणी, वजन मोजणी, महिलांसाठी स्त्रीरोग तपासणी, हाडांची तपासणी, ईसीजी, आवश्यक औषधांचे वितरण, दमा व अस्थमा तपासणी, आहारविषयक मार्गदर्शन, कान-नाक-घसा तपासणी, डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे.
या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा तथा उद्योग मंत्री, योगेश कदम, गृहराज्यमंत्री व महसूल राज्यमंत्री यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, प्रादेशिक उपआयुक्त समाजकल्याण मुंबई विभाग बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, संस्था प्रतिनिधी योगेश पाटील, मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप मुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आवाहन
या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी मंडणगड परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री शशिकांत चव्हाण – ९६०४०२०६३८ यांच्याशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे.

